मयूर गलांडे
मुंबई - महाराष्ट्रातील राजकारणात अविश्वसनीय घडामोडी पाहायला मिळाल्या. तीन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. रात्रीच्या साखरझोपेतून जागे झालेल्या महाराष्ट्राला हा मोठा धक्का बसला. ज्याप्रमाणे हा धक्का महाराष्ट्रातील जनतेला होता, तोच धक्का पवार कुटुंबीयांनाही झाला. पवार कुटुंबाचे प्रमुख शरद पवार यांनीही अजित पवारांच्या या शपथविधीची माहिती नव्हती. त्यामुळे भाजपा-राष्ट्रवादीच्या सरकारला पवारांनी पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं.
अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र भाजपाला दिल्यानंतर भाजपाकडून सरकार स्थापन करण्यात आलं. मात्र, अजित पवारांच्या या निर्णयाचे उलट परिणाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळालं. अजित पवारांच्या भूमिकेला माझा आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे शरद पवारांनी ट्विट केलं. त्यानंतर, अजित पवार आणि शरद पवार असा राजकीय व कौटुंबिक वाद महाराष्ट्रासमोर आला. शरद पवारांच्या ट्विटनंतर काही वेळातच, सुप्रिया सुळेंच व्हॉट्सअप स्टेटस व्हायरल झालं. ज्यामध्ये, अजित पवारांच्या निर्णयामुळे पहिल्यांदाच पवार कुटुंबीयांत फूट पडल्याचं त्यांनी म्हटलं होतं. सुप्रिया सुळेंच्या स्टेटसनंतर थोड्याच वेळात, शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे रोहित यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन अजित पवारांचा फोटो हटवून आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचं जाहीर केलं. शरद पवार यांच्या ट्विटनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन बैठका घेऊ लागले. अजित पवारांसोबत गेलेले आमदार परत स्वगृही फिरायला सुरुवात झाली. दोन दिवस या आमदारांची घरवापसी पाहायला मिळाली.
तर, अजित पवारांनी पुन्हा एकदा ट्विट करुन निश्चत राहा. मी राष्ट्रवादीसोबत असून शरद पवार हेच आपले नेते आहेत, असे ट्विट अजित पवारांनी केलं होतं. त्यानंतर, काही वेळातच शरद पवारांनी ट्विट करुन आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजित पवार संभ्रम निर्माण करत आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काका-पुतण्यातील राजकीय संघर्षात प्रतिष्ठा पणाला लागली होती. एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे शरद पवार, असा सामना रंगला होता. अजित पवारांसोबत गेलेले सर्वच आमदार शरद पवारांच्याबाजुने असल्याचं सांगत परत आले. शरद पवारांना आम्ही सोडूच शकत नाही, असे म्हणत आपला उघडपणे पाठिंबा जाहीर केला. त्यात, महाविकास आघाडीने आम्ही 162 म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारात सर्वच आमदारांचा शपथविधी सोहळा घेतला. महाविकास आघाडीच्या या शक्तिप्रदर्शानंतरही भाजपा नेते बहुमत चाचणीत पाहा, असे म्हणत विश्वास व्यक्त करत होते. तर, दुसरीकडे पवार कुटुंबातील दोन व्यक्तींच्या लढाईकडे देशाचे लक्ष लागले होते. अजित पवारांची भूमिका निर्णायक ठरणार होती, तर शरद पवारांचा अनुभव अन् प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे काका पुतण्याच्या लढाईत कोण जिंकणार याची सर्वांना उत्सुकता होती.
मंगळवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले. न्यायालयाचा हा सर्वोच्च निर्णय भाजपासाठी धक्कादायक होता, कारण खुलेआम लाईव्ह चित्रीकरणात हे बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून अजित पवारांची थेट कुटुंबातील जवळच्या व्यक्तींनीच मनधरणी केली. काकू प्रतिभा पाटील आणि दाजी सदानंद सुळे यांच्याकडूनच अजित पवारांचं मन वळविण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे, अजित पवारांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला. त्यानंतर, भाजपानेही सत्ता स्थापनेचा आणि बहुमत चाचणीचा दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलं. अखेर, काकांच्या अनुभवापुढे पुतण्याचा खेळ खल्लास झाला.
अजित पवारांचं जेवढं वय आहे, तेवढा संसदीय कामकाजाचा अनुभव शरद पवारांना आहे. त्यामुळे काकांशिवाय अजित पवारांच राजकारण शक्य नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या सोलापूर येथील भाषणात अजित पवारांवर टीका करताना, काकांनी हात काढला तर पानपट्टीवाला तरी विचारल का? असे म्हटले होते. मात्र, राष्ट्रवादीचा गट फोडून भाजपासोबत गेलेले अजित पवार एकटे पडल्यानंतर तेही सिद्धच झाले असे म्हणता येईल. नितीन गडकरींनी म्हटल्याप्रमाणे क्रिकेटच्या सामन्यात शेवटच्या क्षणी गेम पलटू शकतो, येथेही आयसीसी अध्यक्ष राहिलेल्या काकांनी पुतण्याचा पराभव करून 'गेमचेंजर असल्याचं पुन्हा एकदा देशाला दाखवून दिलंय. तर, शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून आपणच किंगमेकर असल्याचंही महाराष्ट्राला दाखवून दिलंय.