शरद पवारांचा 'राजकीय वारसदार' ठरला, ना अजितदादा ना सुप्रियाताई...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 05:23 PM2019-10-07T17:23:42+5:302019-10-07T17:58:41+5:30
शरद पवार यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली असून रोहित पवार आणि पार्थ पवार यांनी निवडणुकांच्या रणांगणात उडी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या वारसदारी घोषणाच केली आहे. शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण? असा प्रश्न त्यांना झी 24 तास वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना पवारांनी आपल्या राजकीय वारसदाराबद्द सांगितले. शरद पवार यांचा राजकीय वारसदार हे तिसऱ्या पिढीतील रोहित पवार किंवा पार्थ पवार यांच्यापैकी एक आहे.
शरद पवार यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली असून रोहित पवार आणि पार्थ पवार यांनी निवडणुकांच्या रणांगणात उडी घेतली आहे. पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, पार्थ यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर, आता रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. पवारांची तिसरी पिढी राजकारणात आल्यामुळे पवारांचा राजकीय वारसदार कोण, असा प्रश्न नेहमीच अनेकांच्या मनात येतो. या प्रश्नाला पवार यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. पवार घराण्याचा पुढचा वारसदार कोण, हे जनताच ठरवेल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. पार्थ आणि रोहित यांच्यापैकी पवार घराण्याचा पुढचा वारसदार कोण, असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवारांनी म्हटले की, ज्याला लोकांचा पाठिंबा मिळेल आणि लोक ज्याला पुढे आणतील, तोच वारसदार ठरेल, असे म्हणत पवारांनी जनतेच्या कोर्टात हा चेंडू टाकला आहे.