शरद पवारांचं मोठं विधान! 'मविआ' माध्यमातून निवडणुका लढवण्याचा निर्णय अद्याप नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 11:55 AM2022-07-01T11:55:12+5:302022-07-01T11:56:15+5:30
पत्रकार परिषद सुरू असताना उद्धव ठाकरे यांचा फोन आला. मात्र त्यांना नंतर बोलतो असं कळवलं अशीही माहिती पवारांनी दिली.
मुंबई - राज्यातील सत्तानाट्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार आणि १२ अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीची साथ सोडल्याने ठाकरे सरकार धोक्यात आले. सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपा-शिंदे गटाने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला.
राज्यातील राजकारणात घडलेल्या या घडामोडीमुळे आगामी काळात महाविकास आघाडीचं काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी माध्यमांत याबाबत मोठे विधान केले. शरद पवार म्हणाले की, आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही असं विधान केल्यानं मविआच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
भाजपाचं धक्कातंत्र
दिल्लीहून सूचना आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सरकारबद्दल लोकांना विश्वास वाटायला हवा. ज्याप्रकारे शिंदे-फडणवीस सरकार आले त्यामुळे अनेकांना अपेक्षित नव्हतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सगळ्यांना वाटत होते. धक्कातंत्र भाजपाने अवलंबलं आहे असं पवारांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंचा फोट कट केला अन्...
पत्रकार परिषद सुरू असताना उद्धव ठाकरे यांचा फोन आला. मात्र त्यांना नंतर बोलतो असं कळवलं अशीही माहिती पवारांनी दिली. एकनाथ शिंदेबाबत जी भूमिका भाजपाने घेतली ती आधीच घेतली असती तर हे सगळं झालं नसतं. शिवसेना आणि विधिमंडळ पक्ष हा वेगळा असतो. पक्ष निर्णय घेतो, तिकीट देतो, निवडून आलेले ५ वर्षासाठी असतात परंतु पक्ष कायम असतो असं सांगत शरद पवारांनी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच राहील असे स्पष्ट केले.
ठाकरे लोकांमध्ये जातील तेव्हा चित्र उलट असेल
शिवसेनेचे लोक परत येतील असं वाटत नाही. जी काही देवाण-घेवाण झाली असेल ती झाल्यानंतर परत फिरणं होणार नाही. गुवाहाटीला त्या हॉटेलभोवती ३०० पोलीस होते, कुणाला आत जायची परवानगी नव्हती. त्यामुळे संपर्क साधता आला नाही. बंडखोर आमदारांसोबत काय करायचं हा शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा प्रश्न आहे. लोकांना आता जे झाले ते आवडलं नाही. ठाकरे लोकांमध्ये जातील तेव्हा चित्र उलट असेल असा दावाही पवारांनी केला आहे.