Join us

Video: साताऱ्यात शरद पवारांनी उडवली 'कॉलर'; उदयनराजेंच्या उमेदवारीवरही बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 4:01 PM

साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचा वेगळाचा थाट असतो. खासदार असताना किंवा नसतानाही त्यांच्या स्टाईलची नेहमीच चर्चा राजकीय वर्तुळात होत असते.

मुंबई/सातारा - राज्यातील महायुतीच्या जागावाटपात रस्सीखेच सुरू असलेल्या साताऱ्यातील जागेवर अखेर भाजपाकडून खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी आज सातारा दौरा केला. यावेळी, उदयनराजेंबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. त्यानंतर, पत्रकाराने कॉलर उडवण्यासंदर्भात विचारले असता, स्वत: शरद पवारांनी कॉलर उडवून दाखवली. 

साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचा वेगळाचा थाट असतो. खासदार असताना किंवा नसतानाही त्यांच्या स्टाईलची नेहमीच चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. उदयनराजेंनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही अनेकदा कॉलर उडवून विरोधकांना इशारा दिला होता. विशेष म्हणजे एका कार्यक्रमात स्वत: शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली होती. त्यानंतर, आता साताऱ्यात लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवार यांचा दौरा होता. त्यावेळी, त्यांनी स्वत:ची कॉलर उडवून उदयनराजेंना अप्रत्यक्षपणे चॅलेंज दिलं आहे. सध्या, शरद पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, ते कॉलर उडवताना दिसून येतात. 

महायुतीततून उदयनराजे यांच्या नावाची अद्यापही अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यामुळे, उदयनराजेंनी तुमच्याशी काही संपर्क केला का?, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्यांनी, नाही असं उत्तर दिलं. तसेच, साताऱ्यात उदयनराजेंच्या स्टाइलने कॉलर उडवून एकप्रकारे उदयनराजेंनाच इशारा दिला आहे. त्यामुळे, शरद पवारांच्या या अंदाजाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.  

दरम्यान, शरद पवार यांनी आज साताऱ्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतली, या बैठकीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आरोग्याचं कारण देत पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, आता साताऱ्यात शरद पवार (Sharad Pawar) कुणाला उमेदवारी देणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनिल माने, सत्यजित पाटणकर ही नावे कार्यकर्त्यांनी सूचवली आहेत, अशी माहितीही शरद पवार यांनी दिली. त्यामुळे, साताऱ्यात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, हीच सध्या चर्चा आहे. 

उमेदवार देताना विशेष काळजी

साताऱ्यातील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. लोकसभेत श्रीनिवास पाटील यांनी चांगले काम केले. पुन्हा एकदा त्यांनी निवडणुकीत उभं रहावं अशी आमची मागणी होती. पण, त्यांनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. मी जरी उमेदवारी घेतली नाही, तरी मी पक्ष देईल ती जबाबदारी पूर्ण करेन, असं श्रीनिवास पाटील यांनी सांगितल्याची माहिती शरद पवारांनी दिली. सातारा जिल्हा आम्हाला पाठिंबा देणारा जिल्हा आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विश्वासात घेतलं पाहिजे. साताऱ्यात उमेदवार देताना विशेष काळजी घ्यावी लागेल, असंही शरद पवार म्हणाले.   

टॅग्स :उदयनराजे भोसलेसातारा परिसरशरद पवारलोकसभालोकसभा निवडणूक २०२४