शरद पवार, मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांना धमकी, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 09:14 PM2020-09-07T21:14:02+5:302020-09-07T21:14:16+5:30
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणात धमकीचे फोन येत आहेत. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका देशमुख यांनी कंगनावर केली होती
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनादेखील धमकीचा फोन आला आहे. हा धमकीचा फोन भारताबाहेरून आल्याची माहिती मिळत आहे. मातोश्रीप्रमाणे वर्षावरही धमकीचा फोन आला होता. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धमकीचा फोन आला होता. तर, अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आल्याची तक्रार नागपूर पोलिसात दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तपास करण्याचे सूचवले आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणात धमकीचे फोन येत आहेत. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका देशमुख यांनी कंगनावर केली होती. त्यानंतर त्यांना धमकीचा फोन आल्याचं कळतं आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीही काळजी व्यक्त केली आहे. ''ज्या कोणी या धमक्या दिल्या आहेत, त्याचा तपास केला पाहिजे. धमकी देणारे कोण आहेत, खरे की खोटे, हे प्रकरण गंभीर आहे किंवा नाही, याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच, जोपर्यंत धमकी देणाऱ्यांचा तपास लागत नाही, तोपर्यंत या सर्व नेत्यांची सुरक्षा यंत्रणा कडक केली पाहिजे,'' असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं 'मातोश्री' निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. हा फोन दुबईहून आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपण दाऊदचे हस्तक असल्याचं म्हटलं होतं. हा फोन नेमका कोणी केला होता, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलीस दलातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणाऱ्या व्यक्तीनं दाऊद इब्राहिमच्या नावानं धमकी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? मातोश्रीच्या लँडलाईनवर दुबईहून फोन कॉल कुणी केला?, याचा तपास आता सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे.