मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून १६ एप्रिल रोजी त्यासाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी दोन पॅनेलमध्ये चुरस असून रंगभूमीचे विश्वस्त असल्याने शरद पवार यांच्या भूमिकेकडे पॅनेलचे आणि सर्वच मतदारांचे लक्ष लागले होते. अखेर, शरद पवार यांनी आपली भूमिका जाहीर केली असून आपण या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचं त्यांनी ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलंय. त्यामुळे, आता दोन्ही पॅनेलकडून स्वतंत्रपणे जोमाने प्रचाराला सुरुवात होईल.
रंगभूमी आपली आहे. त्यामुळे पॅनलही आपलेच हवे, आपल्या माणसांचे असे म्हणत निर्माते नवनाथ (प्रसाद) कांबळी यांच्या आपलं पॅनलने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचाराचा शंखनादही केलाय. आरोपांचा समर्थपणे सामना करून ते खोडून काढल्यानंतर आपलं पॅनल पुन्हा नव्या जोमाने निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. तर, दुसरा पॅनेल हा अभिनेते प्रशांत दामले यांचा असून ‘रंगकर्मी नाटक समूह’ असं त्यांच्या पॅनेलचं नाव आहे. शरद पवार यांनी दोन्ही पॅनेलला शुभेच्छा दिल्या आहेत. 'मी परिषदेचा तहहयात विश्वस्त या नात्याने निष्पक्षपाती राहून कोणत्याही पॅनेलला पाठिंबा जाहीर न करण्याची माझी भूमिका आहे. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा', असे ट्विट पवारांनी केलंय. दरम्यान, यावरुन शरद पवार हे राज्यातील अनेक मोठ्या संस्था आणि परिषदांच्या राजकारणात सक्रीय असतात हे दिसून येते.
दामले विरुद्ध कांबळे
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीसाठी दोन-पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यामध्ये ‘रंगकर्मी नाटक समूह’ आणि 'आपलं पॅनल'से दोन पॅनल आमने- सामने आहेत. अभिनेते प्रशांत दामले ‘रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलचे प्रतिनिधित्व करत आहेत तर 'आपलं पॅनल' हे निर्माते प्रसाद कांबळी यांच्या प्रतिनिधित्वात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. या दोन्ही गटांमध्ये आता प्रचंड मोठा चुरशीचा सामना आहे.