Join us

"कुठे भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये..."; शरद पवारांचे महायुती सरकारबद्दल धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 2:58 PM

शरद पवार यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत झालेल्या भ्रष्टाराचाराबद्दल भाष्य केलं.

Sharad Pawar on Rakot Fort : सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तर हा पुतळा नौदलाने उभारला असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुसरीकडे महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन करण्याचे ठरवलं आहे. या घटनेबाबत बोलताना शरद पवार यांनी पुतळा उभारण्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे म्हटलं आहे.

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. नट बोल्ट गंजल्याने हा पुतळा कोसळला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटलं. तर ही घटना घडली तेव्हा वाऱ्याचा वेग ४५ किमी प्रतितास होता. त्यामुळे पुतळा कोसळला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. दुसरीकडे महाविकास आघाडीने या घटनेवरुन महायुती सरकारवर निशाणा साधला  आहे. या घटनेच्या निषेधार्थ मविआकडून रविवारी १ सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मारकाला वंदन करून गेट वे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पुतळ्याच्या उभारणीत झालेल्या भ्रष्टाराचाराबद्दल भाष्य केलं.

"साधी सरळ गोष्ट आहे यात राजकारण कुठेय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रांझ्याच्या पाटलाने एका महिलेवर अत्याचार केले. त्यावेळी ही तक्रार छत्रपती शिवरायांपर्यंत गेली. त्यानंतर त्यांनी त्याचे दोन्ही हात कलम केले. अशा कृत्याची परिणीती काय हे त्यांनी जनतेच्या समोर ठेवलं. एका भगिनीला त्रास दिला म्हणून एवढा कठोर निर्णय त्यांनी घेतला. आज असा निर्णय घेणाऱ्याची प्रतिकृती तयार करण्यात जो भ्रष्टाचार झाला त्यामुळे ती मूर्ती उद्धवस्त झाल्याची दिसते. कुणीतरी सांगितले की वाऱ्याच्या वेगाने कोसळली. तिथे पंतप्रधानांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झालं. आज भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचला आहे. कुठे भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचे तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नाही. लोकांच्या मनातील तीव्र भावना खुली करावी म्हणून आम्ही तिघांनी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करुन हा कार्यक्रम हाती घेतला आहे," असं शरद पवार म्हणाले.

टॅग्स :शरद पवारसिंधुदुर्गएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे