मुंबई/सोलापूर - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार ह्यांनी कधीकाळी लढवलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाकडे सध्या राज्याचं लक्ष लागलं आहे. माढ्यातून भाजपाने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या उमेदवारांनी सोलापूर जिल्ह्यातून कडाडून विरोध होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघात प्रभाव असलेल्या मोहिते पाटलांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तर, धैर्यशील मोहित पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यातच, शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुण्यात भेट झाल्यानंतर करेक्ट कार्यक्रम झाल्याचं बोललं जात आहे.
भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे अकलूजचे मोहिते पाटील नाराज आहेत. दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रात भाजपला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. उद्या अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील यांच्यासह धैर्यशील मोहिते पाटील खासदार शरद पवार यांची मुंबई भेट घेणार असून उद्याच पक्ष प्रवेश कऱणार असल्याचे बोलले जात आहे. जयसिंह पाटील यांच्या व्हिडिओमुळे ही अंदर की बात बाहेर आली. मात्र, शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आजच्या भेटीतच सर्वकाही ठरल्याचंही आता बोललं जात आहे.
पुण्यातील कोंढव्यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचा लग्नसोहळा बुधवारी पार पडला. या लग्नसोहळ्याला राजकीय वर्तुळातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यावेळी शरद पवार, संजय राऊत, हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील शेजारी बसलेले होते. या सोहळ्यात शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात चर्चा होत असल्याचेही दिसून येते. त्यामुळे शरद पवारांनीच करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे. जयसिंह मोहिते पाटलांच्या विधानाला आजची भेटही तितकीच कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी अकलूजमध्ये जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. तर, अद्यापही महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे, मा़ढ्यातील हालचालींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, माढा मतदारसंघातील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनीही विरोध केला होता, तर काही दिवसांपूर्वी अकलूज येथे मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातील नेते रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील यांनीही बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मोहिते पाटील वेगळा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, आज जयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. तर, धैर्यशीलम मोहिते पाटील यांनीही गावभेटी आण दौरे करुन लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.