Sharad Pawar: 'देशात भाजपचा अश्वमेध रोखण्याचं काम शरद पवारांनी केलं - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 05:44 PM2022-07-12T17:44:43+5:302022-07-12T17:46:00+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील पाच वर्षे विरोधात काढली, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ५४ आमदार निवडून आणले. शरद पवार यांच्या विचाराने, कल्पकतेने, दूरदृष्टीने राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. हे आव्हान दिल्लीतील लोकांना आवडले नाही व पहिल्या दिवसापासून आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न सर्व मार्गांनी झाल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच, देशात भाजपचा अश्वमेध रोखण्याचं काम शरद पवारांनी करुन दाखवलं, असेही पाटील यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली. यावेळी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचे आवाहन केले. यावेळी, बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भाजपवर निशाणा साधला.
देशात कुठेच भाजपचा अश्वमेध कुणी रोखला नाही. मात्र, पवार साहेबांनी अशक्य ते शक्य करून दाखवत राज्यात सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षाचे सरकार स्थापन केले व कृतीतून दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही हा विश्वास निर्माण केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. आता अडीच वर्षे विरोधी पक्षाची भूमिका चांगल्याप्रकारे बजावली तर पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी एकंदरीत राज्यातील पक्षनेत्यांकडून जिल्ह्यांचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.