शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:06 AM2021-04-04T04:06:24+5:302021-04-04T04:06:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयातून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पाेहाेचले.
शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होत होता. तपासणीनंतर पित्तनलिकेतील खडे हे त्यामागचे कारण असल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या ट्वीटनुसार, ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांकडून शरद पवार यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर त्यांना सात दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. १५ दिवसांनंतर पुन्हा एकदा त्यांची तपासणी केली जाईल आणि प्रकृती उत्तम आहे, असे निदर्शनास आल्यास त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येईल.
दरम्यान, शरद पवार यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीस जाण्याचे टाळावे, असे आवाहनही मलिक यांनी केले, तर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत ट्वीट केले आहे. ‘महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. शरद पवार फिट अँड फाइन आहेत’, असे त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केले.
.......................................