मुंबई : मराठवाड्यातील भीषण दुष्काळाचा सामना करण्याकरिता सध्या केलेल्या उपाययोजनांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नापसंती व्यक्त केली. टँकर्सची संख्या वाढवा, चारा छावण्या सुरू करा, फळबागा वाचवण्याकरिता प्रयत्न करा, अशा मागण्या पवार यांनी यावेळी केल्या.पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, अंबेजोगाई या भागांना भेट दिली. पवार म्हणाले की, लातूर शहराकरिता सप्टेंबरपर्यंत पुरेल एवढा तर उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, हिंगोली व परभणी या शहरांना डिसेंबरपर्यंत एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील सहा ते सात महिन्यांत पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होणार असून सध्या १२०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र ही संख्या अपुरी असल्याने टँकर्सची संख्या वाढवण्याची गरज आहे. संपूर्ण मराठवाड्यात गुरांच्या छावण्या उभारण्याची मागणी होत असतानाही शासनातर्फे एकही छावणी उघडण्यात आलेली नाही. उपजिविकेकरिता लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरण होत असल्याचे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
दुष्काळ उपाययोजनांबाबत शरद पवार असमाधानी
By admin | Published: August 18, 2015 3:20 AM