पवारांनी शब्द पाळला, 'त्या' आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पोरगा नोकरीवर रूजू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 10:13 PM2019-06-04T22:13:39+5:302019-06-04T22:15:11+5:30
उस्मानाबादमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला दिलेले नोकरीचे आश्वासन त्यांनी पूर्ण केले आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक प्रचारकाळात दिलेला शब्द पाळून दाखवला. उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी लावण्याचे दिलेले आश्वासन पवार यांनी पूर्ण केले. निखिल दिलीप ढवळे असे या मुलाचे नाव असून 3 जून रोजी तो बारामती येथील शारदा प्रतिष्ठान येथे नोकरीवर रुजू झाला आहे.
उस्मानाबादमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला दिलेले नोकरीचे आश्वासन त्यांनी पूर्ण केले आहे. मराठवाड्यातील दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या दिलीप ढवळे यांनी 12 एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक प्रचारातून वेळ काढून ढवळे कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी कुटुंबाचे सांत्वन करत त्यांनी मुलाला नोकरीचे आश्वासन दिले होते. पवारांनी या पीडित मुलाला नोकरी देत हे आश्वासन पाळले आहे. त्यानुसार, ढवळे यांचा मुलगा निखील यास 3 जून रोजी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये रूजू होण्यास सांगण्यात आले. शरद पवार यांच्या भेटीनंतर चारच दिवसांत निखीलला बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमधून नोकरीनिमित्ताने फोन आला आणि 3 जून रोजी नोकरीवर रुजू करण्यात आले. दिलीप ढवळे यांनी तेरणा साखर कारखान्यातील ऊसतोड वाहतूकीसाठी करार केला होता. त्या करारानुसार वसंतदादा बँकेकडून कारखान्यामार्फत त्यांनी कर्ज घेतले होते. ऊस वाहतूक केल्यानंतर कर्जाची परतफेड केली होती. तरीही, त्यांच्या जमिनीचा लिलाव पुकारण्यात आला. 6-7 वर्षे पाठपुरावा करूनही काहीही होत नसल्याने ढवळे यांनी गळफास घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत सरकारलाही जाब विचारला आहे. ढवळे यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून मदत दूरच राहिली, पण घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधित लोकांवर पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला नाही. त्यामुळे आता झोपी गेलेल्या सरकारला जाग केव्हा येणार? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जातोय, असे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन म्हटले आहे.