Join us

Sharad Pawar VS ED : शरद पवारांच्या ई-मेलला ईडीकडून 'रिप्लाय'; चौकशीचा विषयच मिटला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 1:05 PM

ईडीच्या कार्यालयात निघालेल्या शरद पवारांना ईडीकडून ई-मेलद्वारे महत्त्वपूर्ण निरोप पाठवण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हा नोंदवल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांचा 'पाहुणचार' घ्यायला निघालेले असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांनी पाठवलेल्या ई-मेलला ईडीने रिप्लाय दिला असून, तूर्तास चौकशीची गरज नाही आणि कदाचित पुढेही गरज लागणार नाही, असं त्यात नमूद केल्याचं कळतं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चार्ज करणारा हा विषयच निकाली निघाल्याची चिन्हं दिसत आहेत. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर, दोनच दिवसांनी राजकीय वर्तुळात मोठा धमाका झाला होता. शिखर बँक घोटाळा प्रकरणात आत्तापर्यंत कधीही शरद पवारांचं नाव आलं नव्हतं. परंतु, ईडीनं या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांचं नाव आलं आणि राजकारण तापलं. ईडीला हाताशी धरून भाजपा सूडबुद्धीचं राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांनी केला. अगदी शिवसेनेनंही भाजपावर आडून-आडून बाण सोडले.

थेट शरद पवारांवरच गुन्हा दाखल झाल्यानं राष्ट्रवादीचे राज्यभरातील कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांच्या भावना लक्षात घेऊन, पवारांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ईडी ऑफिसमध्ये जाण्याची घोषणा केली. वास्तविक, ईडीनं त्यांना चौकशीसाठी कुठलंही समन्स पाठवलं नव्हतं. परंतु, तरीही या प्रकरणी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ईडी कार्यालयात जायचा पवित्रा पवारांनी घेतला होता. त्यामुळे तर कार्यकर्त्यांमध्ये नवं बळ संचारलं. 'चलो ईडी' म्हणत ठिकठिकाणचे कार्यकर्ते मुंबईकडे निघाले. त्यामुळे पोलिसांनी अनेक भागात १४४ कलम लागू केलं. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आलं.

या पार्श्वभूमीवरच, शरद पवारांनी वकिलांमार्फत पाठवलेल्या ई-मेलला ईडीने उत्तर दिल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीची ताकद बघून सरकार नरमल्याचा दावा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत.

टॅग्स :शरद पवारअंमलबजावणी संचालनालयराष्ट्रवादी काँग्रेस