शरद पवार उतरले मैदानात, क्वारंटाईन सुविधा अन् परिस्थितीचा घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 06:38 PM2020-05-15T18:38:00+5:302020-05-15T18:38:17+5:30
लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला
मुंबई - मुंबईतील एमएमआरडीए मैदानात अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा उपलब्ध करण्यात येत असून शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट देत पाहणी केली. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा वाढता आलेख आणि मुंबईतील हॉटस्पॉट झोनची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन कालावधीत तब्बल ५० दिवस घरी असणारे शरद पवार आज मैदानात उतरल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी क्वारंटाईन सुविधांची पाहणी केली.
लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठीही शरद पवार यांनी खास हजेरी लावली होती. या बैठकीला, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील एमएमआरडीए मैदानात अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री @rajeshtope11 यांच्यासह येथे भेट दिली व तिथल्या क्वारंटाईन सुविधेचा व परिस्थितीचा आढावा घेतला. pic.twitter.com/k2zC7Eu1cg
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 15, 2020
लॉकडाऊनमुळे राज्यातील साखर उद्योगासमोर आव्हान उभे ठाकले आहे. याबाबत आपण पंतप्रधानांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. केंद्र सरकारने जे पॅकेज दिले आहे त्याची राज्यात अंमलबजावणी कशी करायची तसेच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एकीकडे वैद्यकीय संकट कसे रोखायचे व दुसरीकडे आर्थिक आघाडीवर ठामपणे कसे उभे राहायचे यासाठी तज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालावरही चर्चा झाली. शरद पवार हे लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून नियमित पालन करताना दिसून आले. मात्र, फेसबुक लाईव्ह आणि फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून ते जनतेशी आणि सरकारमधील मंत्र्यांशी कायम चर्चा करत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत त्यांनी व्हिडिओ कॉन्फेरेन्सिंगद्वारेही चर्चा केली. राज्यातील आणि देशातील मराठीजनांसाठी फेसबुक लाईव्हद्वारेही ते संवाध साधताना, प्रश्नांना उत्तरं देताना दिसून आले.
दरम्यान, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याबाबत आज बैठकीत हजेरी लावल्यानंतर ते विलगीकरण ठिकाणावर जाऊन पहाणी करुन आले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह पाहणी करतानाच तिथल्या क्वारंटाईन सुविधेचा व परिस्थितीचा आढावाही शरद पवार यांनी घेतला. गेल्या ५० दिवसांपासून घरी बसून मार्गदर्शन करणारे पवार आज खुद्द मैदानात पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं.