झोपेतसुद्धा 'शरद पवार.. शरद पवार...' करतात, मोदी अन् फडणवीसांना पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 01:14 PM2019-09-19T13:14:33+5:302019-09-19T13:15:09+5:30
गड-किल्ले आपला स्वाभिमान आहे. तिथे काही मोडनिंब आणि चौफुला थाटायचा नाही.
मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच, मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षांत काय केले, हे सांगायला निघाले. काय केले ते पाच मिनिटांत सांगतात अन् सगळे भाषण माझ्यावर करतात. मी चौदावेळा निवडून आलोय. आता मला निवडणूक लढवायची नाही. व्यक्तिश: या निवडणुकीत रस नाही. परंतु, मला कर्तृत्ववान तरुण पिढीच्या हातात महाराष्ट्र द्यायचा आहे. मात्र सत्ताधारी सारखे शरद पवार.. शरद पवार... करतात. अगदी झोपेत सुद्धा... असे पवारांनी म्हटले.
गड-किल्ले आपला स्वाभिमान आहे. तिथे काही मोडनिंब आणि चौफुला थाटायचा नाही. असले निर्णय करणाऱ्यांना धडा शिकवा. जे राज्यकर्ते संकटकाळी जनतेला मदत करू शकत नाहीत, त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. कोल्हापुरात पुराचे संकट उद्भवले. तिथे गावा-गावांत जाण्यापेक्षा मुख्यमंत्री हवाई सफर करून आले. लातूरला भूकंप झाला, त्या दिवशी गणेश विसर्जन होते. पहाटे 4 वाजता खिडकीची तावदाने वाजली. मला शंका आली, हा भूकंप तर नसेल. मी कोयनेवरील भूकंप मापन केंद्रात संपर्क केला. किल्लारीत भूकंप झाल्याचे कळले. त्याच क्षणी लातूरला निघण्याचा निर्णय घेतला. पहाटे 6 वाजता मुंबईच्या विमानतळावर होतो आणि 7.15 वाजता किल्लारीत पोहोचलो. परिस्थिती भयंकर होती. 15 दिवस तळ ठोकून थांबलो. ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. अन् सत्ताधारी मला विचारतात, शरद पवारांनी काय केले?
नागपूर गुन्हेगारांची राजधानी...
नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. किंबहुना ती गुन्हेगारांची राजधानी बनली आहे. तिकडे लक्ष द्या. मला आश्चर्य वाटते राज्यकर्त्यांना झोप कशी काय लागते? आपल्या गावात सामान्य माणूस सुरक्षित राहिला पाहिजे.
जे गेले, ते निवडून येणार नाहीत...
विकासासाठी चाललो म्हणून जे गेले, त्यांच्याच हातात सत्ता दिली होती. १९८० साली सुद्धा आम्ही ५८ होतो. त्यातील ५२ जण सोडून गेले होते. म्हणजेच मी पाच आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी सुद्धा पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरलो अन् ५२ च्या ५२ पडले. त्यावेळी चार वर्षांचा कालावधी लागला. आता महिन्यातच त्यांचा निकाल लागणार आहे.