मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानामुळे सध्या राज्यातील राजकारणामध्ये गदारोळ उठला आहे. राज्यपालांनी हे विधान केले तेव्हा तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हेही उपस्थित होते. मात्र त्यांनी या वादावर कुठलेही भाष्य केले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणं हा राज्यपालांचा लौकिक आहे. शिवरायांबाबत बोलताना त्यांनी मर्यादा सो़डली. राज्यपालांच्या या विधानांची पंतप्रधान राष्ट्रपतींनी दखल घ्यावी. राज्यपाल पदावर जबाबदार व्यक्तीची निव़़ड करावी, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले की, हा जो काही आहे तो वाद आहे असं मला वाटत नाही. राज्यपाल बोलले तेव्हा मी तिथे होतो. मी आणि गडकरी तिथे असताना त्यांनी जो उल्लेख केला तो माझ्याबाबत नाही मात्र गडकरींबाबत केला. या राज्यपालांचं वैशिष्ट्य म्हणजे ते आल्यापासून आपण पाहतोय ती अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधाने करणे हा त्यांचा लौकीक आहे. चुकीची विधानं करणं. समाजात गैरसमज वाढवण्याची खबरदारी घेणं हेच त्यांचं मिशन आहे का, अशी शंका येते. एकंदरीत या पदावर जबाबदारीनं भूमिका घ्यायची असते याचं स्मरण नसलेली व्यक्ती महाराष्ट्रात पाठवली आहे. राज्यपाल पदाचा मान ठेवायचा म्हणून मी त्याबाबत अधिक बोलत नाही.
शरद पवार पुढे म्हणाले की, शिवछत्रपतींबाबत उल्लेख करून त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. नंतर काल शिवरायांचं कौतुक करणारं त्यांचं विधान आलं. मात्र हे सर्व तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सूचलेलं शहाणपण आहे. त्यामुळे याचा निर्णय आता राष्ट्रपतींनी आणि पंतप्रधानांनी घेतला पाहिजे, अशा व्यक्तीकडे अशा जबाबदाऱ्या देता कामा नयेत. असं मला वाटतं, असेही शरद पवार यांनी सांगितले.