'शिवतीर्थ'वर जाऊन शरद पवार गट, शिंदे गटाचे नेते मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 01:50 PM2023-08-29T13:50:32+5:302023-08-29T13:51:00+5:30
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षातील नेतेही २ गटात विभागले गेले. अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाणे पसंत केले.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका, कार्यकर्त्यांना नियोजित कार्यक्रम देणे, पक्ष संघटना मजबूत करण्याकडे राज ठाकरेंनी भर दिला आहे. मनसेने अलीकडेच मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत कोकण जागर यात्रा काढली. खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. टोलनाक्याच्या विषयावर भाजपाने अमित ठाकरेंवर टीका केली होती. त्यापासून राज ठाकरे भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजपा-मनसे यांच्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू झाली. याच राजकीय घडामोडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदाराने भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी राज यांची भेट घेतली. अनिल देशमुख आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे कारण स्पष्ट झाले नाही. परंतु सध्या जी राज्यात राजकीय परिस्थिती आहे अशात अनिल देशमुखांनी राज ठाकरेंची भेट घेणे महत्त्वाचे मानले जात आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षातील नेतेही २ गटात विभागले गेले. अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यात अनिल देशमुख हे शरद पवारांसोबत कायम राहिले. राष्ट्रवादीच्या संघर्षाच्या काळात अनिल देशमुख हे शरद पवारांसोबत राज्याच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यात दादरच्या शिवतीर्थ निवासस्थानी अनिल देशमुख यांनी येऊन राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली आहे. अनिल देशमुखांच्या भेटीनंतर सरनाईक राज यांच्या भेटीला पोहचले होते. या भेटीनंतर आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, पहिल्यांदाच राज्य शासनाच्या वतीने वरळीच्या डोम येथे प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रामुख्याने मुंबई, ठाण्यातील बहुतांश गोविंदा पथक तिथे येणार आहेत. युवासेनेचे पुर्वेश सरनाईक यांच्या आयोजनातून हे पार पडतंय. मोठ्या संख्येने तरूण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने राज ठाकरेंनी तिथे हजर राहावं यासाठी पुर्वेशने त्यांना निमंत्रण दिले. हे निमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
दरम्यान, वरळीत हा कार्यक्रम होतोय, राज्य शासनामार्फत प्रो गोविंदा होणार आहे. कुठल्याही खासगी पक्षाचा हा कार्यक्रम नाही. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी तिथे यायला हवे. राज्य सरकारने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचसोबत सिनेक्षेत्रातील अनेक दिग्गज कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यामुळे राजकीय हेवेदावे बाजूला ठेऊन त्यांनी यायला हवे. आदित्य ठाकरेंना निमंत्रणाची गरजच काय? असा सवाल करत अप्रत्यक्षपणे सरनाईक यांनी ठाकरेंना टोला लगावला.