मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. १३७ वर्षांच्या इतिहासातील ही सहावी निवडणूक जिंकत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शशी थरूर यांचा पराभव केला. निकाल जाहीर होताच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी खरगेंच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेतून फोन करून खरगे यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही खरगेंचे अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी एकेकाळी निवडणूक लढवली होती.
खरगे यांच्यावर निवडीनंतर देशभरातील कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी मतमोजणीनंतर जाहीर केले की, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ९,३८५ मतांपैकी खरगे यांना ७,८९७ आणि शशी थरूर यांना १०७२ मते मिळाली, तर ४१६ मते अवैध ठरविण्यात आली. खरगे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याचे मिस्त्री यांनी येथे एआयसीसी मुख्यालयात पत्रकार परिषदेत बुधवारी जाहीर केले. खरगेंविरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढत असलेले शशी थरूर यांना केवळ १० टक्के मते मिळाली.
काँग्रेसच्या या निवडणुकीमुळे यापूर्वी झालेल्या पक्षातील निवडणुकांचीही चर्चा पुढे आले. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी काँग्रेस नेते शरद पवार यांनीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुकी लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. सन १९९७ साली काँग्रेस अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी, सीताराम केसरी विजय झाले होते. केसरी यांना ६२२४ मतं मिळाली होती. तर, शऱद पवार आणि राजेश पायलट यांचा पराभव झाला होता. शरद पवार यांना ८८२ मतं मिळाली होती, तर पायलट यांना ३५४ मतं मिळाली होती.
दरम्यान, २००० साली झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोनिया गांधी यांचा विजय झाला होता. सोनिया गांधींना ७४४८ मतं मिळाली होती, तर, जितेंद्र प्रसाद यांना केवळ ९४ मतं मिळाली होती.
थरुर यांच्याकडून खरगेंचं अभिनंदन
खरगे यांच्या विजयाबद्दल मी अभिनंदन करतो. पक्षाच्या प्रतिनिधींचा निर्णय अंतिम असतो आणि तो नम्रपणे मी स्वीकारतो. अशा पक्षाचे सदस्य होणे ही सौभाग्याची बाब आहे, जो पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना आपला अध्यक्ष निवडण्याची परवानगी देतो. सोनिया गांधी यांनी एक चतुर्थांश शतकासाठी आणि निर्णायक काळात पक्षाचे नेतृत्व केले. त्यामुळे सोनिया गांधी यांचे पक्षावर परतफेड न करता येणारे ऋण आहेत. नेहरू आणि गांधी कुटुंबियाने काँग्रेस पक्षाच्या सदस्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.