मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर ते पत्रकारंशी बोलताना आपण शेतकरी आंदोलनावर भाष्य करणार नाही, असेही स्पष्ट केले होते. कृषिमंत्री असताना लिहिलेल्या पत्रात किमान एमपीएमसीचा उल्लेख आहे. ते पत्र विरोधकांनी नीट वाचावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी विरोधकांना सुनावले.
आज बुधवार सर्वपक्षीय नेत्यांसमवेत पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली, अर्धा तास बैठक चालली. ''पुणे शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतुकीचा वाढता भार असल्याने पुरंदर इथे नवा विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने दिलाय. प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगती व प्राधान्यक्रमाने सुरू व्हावे यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतल्याचे पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले. त्यामुळे, पुरंदर येथील विमानतळासाठी जमिन अधिग्रहण कामाला लवकरच सुरुवात होईल, असे दिसून येत आहे. दरम्यान, या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकांरांच्या प्रश्नाला उत्तर देताना विरोधकांना टोला लगावला.
विरोधकांनी पत्र नीट वाचावे
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘विरोधकांनी पत्र नीट वाचावे. वारंवार पत्रावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर पवार चांगलेच संतापले. कृषी कायद्यावर चर्चा झाल्याशिवाय त्यावर भाष्य करणार नाही, असे त्यांनी म्हटले. तरीही काही पत्रकार त्यांना पत्र, शेतकरी आंदोलनावरच प्रश्न विचारत राहिले. त्यावर संतप्त पवार म्हणाले, तुम्ही सारे बाहेर उभे होता ते पाहून मला बरे वाटले नाही, म्हणून मी तुम्हाला बोलावले. प्रश्नाचे एकदा उत्तर दिल्यावरही तुम्ही मला एकच प्रश्न वारंवार विचारून माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला बोलावूनच चूक केली. यापुढे तुम्हाला बोलावणार नाही, अशा शब्दांत पवारांनी पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय कृषी कायद्यात एपीएमसीचा उल्लेख नाहीमाझ्या पत्रात एपीएमसी मार्केटबद्दल सुधारणा केली पाहिजे, असा उल्लेख आहे. केंद्राचे जे कृषी कायदे आहेत त्यात एपीएमसी मार्केटचा उल्लेखच नाही. त्यामुळे आमचे नाव घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’