शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला पोलीस जबाबदार? 'त्या' पत्रातून खळबळजनक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 04:09 PM2022-04-11T16:09:13+5:302022-04-11T16:09:42+5:30
मुंबई पोलिसांना आलेल्या पत्रातून धक्कादायक गौप्यस्फोट
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर गेल्या आठवड्यात हल्ला झाला. आंदोलन करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घराबाहेर चप्पल, दगडफेक केली. निषेधार्थ घोषणाबाजी केली. शरद पवारांच्या घरावर मोर्चा येणार, आंदोलक हल्ला करणार, याची कोणतीही कल्पना पोलिसांना नव्हती का, गुप्तचर यंत्रणा काय होती, पवारांच्या घराबाहेर पुरेसा पोलीस बंदोबस्त का नव्हता, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना जबाबदार धरलं. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना देण्यात आलेलं एक पत्र समोर आलं आहे. शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर आंदोलन होणार असल्याची माहिती ४ एप्रिललाच पोलिसांना मिळाली होती, हे पत्रातून स्पष्ट होत आहे. पोलीस सह आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांना हे पत्र लिहिण्यात आलं होतं.
४ एप्रिलला मंत्रालय, ५ एप्रिलला सिल्वर ओक, मातोश्री बंगल्यावर एसटी कर्मचारी आंदोलन करू शकतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अलर्ट देण्यात आला होता. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. अलर्ट मिळूनही पोलिसांनी पवारांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला नाही आणि पवारांच्या घरावर हल्ला झाला.
पत्रात आणखी काय?
शरद पवारांचं निवासस्थान, मातोश्री यासोबतच आझाद मैदान, मंत्रालय, वर्षा बंगला, सह्याद्री अतिथीगृह, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी आंदोलन होऊ शकतं, असंही पत्रात नमूद करण्यात आलं होतं. हल्ल्याच्या ४ दिवस आधीच पोलिसांना अलर्ट देण्यात आला होता. त्यावर योग्य कार्यवाही झाली असती, तर पवारांच्या घरावर हल्ला झाला नसता, असं बोललं जात आहे. त्यामुळे पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याला पोलिसच जबाबदार आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे.