Join us

गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सातारा पोलीस ताबा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 4:59 PM

कोर्टात सुनावणी होताना सरकारी वकिलांनी सदावर्ते यांना ७ दिवसांची आणखी कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी केली होती.

मुंबई – मागील ४ महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यात काही संतप्त कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक घरावर हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०४ जणांना अटक करण्यात आली होती. सदावर्ते यांच्या प्रकरणात सुनावणी करताना गिरगाव कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या न्यायालयीन कोठडीनंतर सातारा पोलीस सदावर्तेंना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. दीड वर्षापूर्वी केलेल्या विधानावरून सदावर्तेंवर गुन्हा दाखल झाला होता. त्यावर कोर्टाने सदावर्तेंना अटक करण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार गिरगाव कोर्टात सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा देण्यासाठी अर्ज केला होता. त्याला कोर्टाने परवानगी देत १७ एप्रिलला पर्यंत ताबा घेण्यास सांगितले आहे. कोर्टात सुनावणी होताना सरकारी वकिलांनी सदावर्ते यांना ७ दिवसांची आणखी कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी केली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, जयश्री पाटील यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ८० लाख रुपये मिळाल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला. मात्र वारंवार त्याच मुद्द्याच्या आधारे पोलीस कोठडीची मागणी केली जात आहे. आरोपीचा मोबाईल तुमच्या ताब्यातच आहे. हा सगळा तपास भरकटेलेला आहे. आरोपीला पोलीस कोठडी देण्याचं एकही कारण सांगू शकत नाही असं सदावर्तेंच्या वकिलांनी केला. आजच्या सुनावणी अभिषेक पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यावर कोर्टाने निर्णय देत १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सरकारी वकीलांनी केलेला युक्तिवाद

जयश्री पाटील यांना सहआरोपी करण्याची मागणी, आंदोलनाच्या कटात जयश्री पाटील यांचा समावेश

सदावर्ते यांच्या घराच्या टेरेसवर जी बैठक झाली त्यात जयश्री पाटील उपस्थित होत्या.

सदावर्ते यांनी डायरीत पैशाची नोंद ठेवली आहे. त्यात ८० लाख जयश्री पाटील यांना दिल्याचा उल्लेख

५३० रुपये प्रमाणे १ लाख कर्मचाऱ्यांनी पैसे दिले ते २ कोटीच्या आसपास गेले आहेत.

सदावर्तेंच्या वकिलांचा युक्तिवाद

कुठल्याच एसटी कर्मचाऱ्याने पैसे दिल्याबद्दल तक्रार केली नाही मग पैशाचा विषय कसा आला?

आरोपीचा मोबाईल तुमच्याच ताब्यात आहे मग कोठडी कशाला?

अटक केलेल्या आरोपींच्या नावावर सदावर्तेंची पोलीस कोठडी मागणं चुकीचं

नागपूरचा व्यक्ती कोण? याचा संबंध काय?

टॅग्स :शरद पवारएसटी संपन्यायालय