मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हल्ला केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेसह १०३ एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते(Gunratna Sadavarte) यांचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. युक्तिवादावेळी सरकारी वकिलांनी सदावर्तेंवर गंभीर आरोप करत या त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करत आहेत.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितले की, पवारांच्या घरावर हल्ला करणारे आंदोलन हे सदावर्तेंच्या संपर्कात होते. हल्ल्यापूर्वी ४ जणांनी घराची रेकी केली होती. या चौघांना अटक करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते तपासात सहकार्य करत नाहीत. सर्व अटक आरोपींचे मोबाईल जप्त केले त्यातून महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. हल्ल्यापूर्वी एक बैठक झाली होती. अभिषेक पाटील नावाचा एक कर्मचारी सदावर्तेंच्या संपर्कात होता. त्यानेच काही पत्रकारांना तिथे बोलावले.
इतकेच नाही तर एका मराठी न्यूज चॅनेलचा चंद्रकांत सूर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्तेंच्या संपर्कात होता. त्याने काही व्हिडीओ डिलीट केले. या पत्रकाराचे आणि सदावर्तेंचे सकाळी साडेदहापासून चॅटिंग सुरू होते. या दोघांत व्हॉट्सअप कॉल झाला. त्यातील एक कॉल नागपूरहून करण्यात आला होता. त्या व्यक्तीचे नाव आम्ही कोर्टात सांगू शकत नाही असं सांगत सरकारी प्रदीप घरत यांनी कोर्टात सदावर्तेंविरोधात आरोप केले. घटनेच्या दिवशी सकाळी नागपूरहून व्हॉट्सअप कॉल आला आणि त्या कॉलनंतर पत्रकार पाठवाचा मेसेज आला. दुपारी २.४२ मिनिटांनी काही पत्रकारांना कॉल गेला. हा सुनियोजित कट होता असं सरकारी वकीलांनी सांगितले.
तर सरकारी वकिलांचा युक्तिवाद खोडत सदावर्तेंचे वकील गिरीश कुलकर्णी म्हणाले की, सरकारी वकिलांनी केलेले आरोप हे खोटे आहेत. ज्या फोनबाबत आणि सिमकार्डबाबत पोलीस उल्लेख करत आहेत. त्या सिमकार्डची मुदत ३१ मार्च रोजीच संपलेली आहे. त्यामुळे त्यानंतर हा फोन वापरण्यात आला नाही. पत्रकार बोलावले गेले याबाबत सांगितले जात आहे. मग पोलिसांना आधीच माहिती होती तर सुरुवातीलाच बंदोबस्त का लावला नाही? सिल्व्हर ओकवर आंदोलन केले आणि चप्पल फेकली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या आंदोलनात कुणीही जखमी झाले नाही. नागपूरमधील एका व्यक्तीशी बोलणे झाले पण कुणाशी बोलणे झाले आहे हे शोधू शकले नाही असं कधी होतं का? असा सवाल कुलकर्णी यांनी मांडला. त्यावर सरकारी वकिलांनी बचाव करत नागपूरमध्ये कुणाशी बोलणं झालंय याची माहिती आम्ही दिलीय फक्त नाव घेता येत नाही असं कोर्टाला सांगितल्याचा उल्लेख केला. त्यामुळे नागपूरातील तो व्यक्ती कोण आहे? याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.