राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन सध्या राज्यात गोंधळ सुरू आहे. भाजप नेते आणि कार्यकर्ते अजित पवारांविरुद्ध आक्रमक झाले आहेत. मात्र, आता हा वाद थांबला पाहिजे, आजच्या परिस्थितीत या सगळ्या गोष्टी बाजूला सारून बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण यावर विचार करायला हवा, असे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच, शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून, समर्थकांकडून अनेकदा जाणता राजा ही पदवी देण्यात येते. याबद्दलही भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शरद पवारांना उद्देशून जाणता राजा ही पदवी मला मान्य आहे, कारण मी त्यांच्यासोबत फिरलो आहे. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं, महिलांचे प्रश्न असतील, विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा विषय असेल. जो जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे? आम्ही म्हणतो, तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी शरद पवारांचा उल्लेख जाणता राजा या पदवीने केला आहे. तसेच, यास माझे समर्थनही आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच, अजित पवार यांच्या विधानावरील वाद थांबायला हवा असेही ते म्हणाले.
अजित पवार यांच्या विधानावरुन होत असलेला वाद आता थांबायला हवा. अजित पवारांनी संभाजी राजेंचा अपमान केला नाही, याउलट भाजपच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांना कमी लेखण्याचे काम केले, अजित पवारांनी तसं केलं नाही. संभाजीराजेंनी स्वराज्याचे रक्षण केलं, म्हणून त्यांना स्वराज्य रक्षक म्हटलं. पण कुणाला धर्मवीर म्हणायचं असेल, तर म्हणू शकता. भाजपच्या नेत्यांची वक्तव्यं यावर पांघरूण घालण्यासाठी हा वाद सुरू आहे. मात्र, आता हा वाद थांबायला हवा, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
धर्मवीर म्हणा, कुणी स्वराज्यरक्षक म्हणा
जर अजित पवार यांचं चुकीचं असतं, तर विधान सभेत त्याचवेळी त्यांना सांगायला हवं होतं की, हे रेकॉर्डवर चुकीचं जात आहे. यापूर्वी एका वर्गाने शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. मग शिवाजी महाराज आमचे प्रतिपालक नाही का? ते फक्त त्यांचेच प्रतिपालक आहे का? आजच्या परिस्थितीत या सगळ्या गोष्टी बाजूला सारून बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण यावर विचार करायला हवा, असेही भुजबळ यांनी म्हटले. तर, संभाजी महाराजांना कुणी धर्मवीर म्हणा, कुणी स्वराज्यरक्षक म्हणा, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.