मुंबई - शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता सर्वच आमदारांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुंबईत येऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली. यावेळी, राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. तसेच, दोन्ही नेत्यांना पेढाही भरवला. या पेढा भरवतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांसह आज मुंबईत पोहोचले. यावेळी, त्यांच्या बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तत्पूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी 8 वाजता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी, राज्यपालांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. तत्पूर्वी, पेढा भरवूनही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आता, शरद पवार यांनी राज्यपालांच्या या कृतीचा त्यांच्या शैलीत समाचार घेतला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवला होता, त्यावरुनही शरद पवार यांनी राज्यापालांना टोला लगावला आहे. जवळपास 1990 सालापर्यंत मी वेगवेगळ्या पदावर शपथा घेतल्या आहेत. पण, आजपर्यंत मला कुठल्याही राज्यपालांनी पेढा भरवला नाही. यापूर्वी, ज्यांनी शपथ घेतली, त्यांना फुलांचा गुच्छही देताना मी पाहिलं नाही. यावेळी त्यांनी दिला याचा आनंद आहे. राज्यपालांनी गुणात्मक बदल केलाय, असे म्हणत पवारांनी राज्यपालांना चिमटा काढला.
दरम्यान, सभागृहात गेल्यानंतर बंडखोर आमदारांचं मतपरिवर्तन होईल, असा काहींना विश्वास आहे, असे म्हणत शरद पवारांनी बहुमत चाचणीबाबत सूचक विधान केलं आहे. तर, आम्ही बहुमत सहजच सिद्ध करू असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.