मुंबई - आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने केलेली अटकेची कारवाई व त्यानंतर विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडी कोठडी सुनावल्यामुळे नवाब मलिक यांचा मुक्काम सध्या तुरुंगातच आहे. जामीन मिळविण्यासाठी मलिक यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सर्वार्थ प्रयत्न सुरू असून या आदेशाला आव्हान देणाऱ्या ‘हेबिअस कॉर्पस’ याचिकेत अंतरिम सुटकेची मागणी करणारा मलिक यांचा अंतरिम अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. तर, दुसरीकडे भाजप नेते मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आणि आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संध्याकळी महत्त्वाची बैठक बोलावली होती.
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. दुसरीकडे विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला पेन ड्राईव्ह बॉम्ब सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण, या पेन ड्राईव्हमधील व्हिडिओत शरद पवार, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख यांची नावे घेण्यात आली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीकडून या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रणिनिती आखण्यास चर्चा घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यात, मलिकांच्या राजीनाम्यासह अनेक मुद्द्यावर चर्चा झाल्याचे समजते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी सध्या बैठकांचा जोर सुरू आहे. संध्याकाळी राष्ट्रवादीचे मोजकेच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह सुप्रिया सुळे बैठकीत हजर आहेत. या बैठकीमध्ये मुंबई कार्यकारी अध्यक्ष नियुक्ती, नवाब मलिक राजीनामा, पेनड्राईव्ह प्रकरणात राष्ट्रवादी नेत्यांची नावं आल्यानं पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शरद पवारांनी बोलावलेल्या या बैठकीत नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.