Join us  

शरद पवार एकटे नाहीत, आम्ही सोबत आहोत; राऊतांनी दिला बैठकीचा वृत्तांत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 5:29 PM

राज्यातील सद्याच्या राजकीय परिस्थितीवर नेमकं काय करावं किंवा आपल्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेची आज बैठक झाली

मुंबई - राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात राजकीय उलथा पालथ सुरु झाल्या आहेत. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षातील नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. ५ जुलै रोजी शरद पवार आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून दोघांपैकी कुणाकडे जायचे हा पेचप्रसंग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. दुसरीकडे आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली. 

राज्यातील सद्याच्या राजकीय परिस्थितीवर नेमकं काय करावं किंवा आपल्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेची आज बैठक झाली. त्यामध्ये, आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढवण्यावर एकमत झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. शरद पवार हे एकटे नसून आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असेही राऊत म्हणाले. तसेच, आगामी लोकसभा निवडणुका आणि समान नागरी कायदा याविषयांवर बैठकीत चर्चा झाली. तर, उद्धव ठाकरेंची लवकरच महाराष्ट्र दौरा यात्रा निघणार असून त्याच्या नियोजनावरही आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

मास्टर स्ट्रोक वगैरे काही नसून ईडी आणि सीबीआय यांसारख्या एजन्सीच्या माध्यमातून हे राजकारण सुरू आहे. २०२४ मध्ये आम्हीही मास्टर स्ट्रोक मारू, स्ट्रोकवर स्ट्रोक मारू, २ तास आमच्याकडे ईडी आणि सीबीआय द्या, मग दाखवू, असे शब्दात संजय राऊत यांनी केंद्रीय भाजप नेत्यांवर आरोप केला आहे.  

बैठकीत एकत्र येण्याची चर्चा नाही

मुंबईत मनसे आणि शिवसैनिकांनी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी केली आहे. त्यात आता ठाण्यातही मनसे आणि शिवसैनिकांनी ठाण्यात साहेब आता तरी एकत्र या अशी साद घालणारे बॅनर लावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज, उद्धव एकत्र येण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक आतुर झाल्याचेच दिसत आहे. मात्र, आजच्या बैठकीत यासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही, तसा कुठलाही विषय बैठकीत चर्चेत आला नाही, असे शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले आहे. 

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाउद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार