Jitendra Awhad Babasaheb Purandare: "बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास नव्हे, कादंबरी लिहिली आणि कादंबरी हा इतिहास नसतो"; Raj Thackeray यांच्या सभेनंतर जितेंद्र आव्हाडांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 06:55 PM2022-05-02T18:55:21+5:302022-05-02T19:06:17+5:30
"पुरंदरेंच्या साहित्याला ज्ञानपीठ किंवा ऐतिहासिक लिखाणाबद्दल एकाही विद्यापीठाने डॉक्टरेट का नाही दिली?"
Jitendra Awhad Raj Thackeray Babashaeb Purandare: भारतात ज्यांनी खरोखर इतिहास लिहिला, त्यांची खूप मोठी परंपरा आहे. अनेक ब्राह्मण लेखकांनी इतिहास लिहिला आहे, त्यावर आमचा आक्षेप नाही. पण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास लिहिला नाही, तर त्यांनी कांदबरी लिहिली. कांदबरी हा इतिहास नसतो. इतिहास हा जातीचा, धर्माचा नसतो" असं विधान राष्ट्रवादीचे नेते राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जातीसंदर्भात राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाला आव्हाडांनी उत्तर दिले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, "शरद पवार यांनी कधीही जातीभेद केला नाही. कुसुमाग्रज यांच्या नावावरुन दिला जाणारा पुरस्कार सुरु करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. विरोधी पक्षात असतानाही पवारसाहेबांना अनेक साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून साहित्यिकांनी बोलावले होते. मग हे सर्व साहित्यिक विकले गेले होते का?"
"एस. एम. जोशींपासून अनेक ब्राह्मण नेत्यांसोबत शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पण मुद्दामहून अपप्रचार करुन महाराष्ट्र पेटवण्याचे कारस्थान काही लोक करत आहेत. बाबासाहेब पुरंदरेंच्या साहित्याला ज्ञानपीठ का नाही मिळाला? किंवा ऐतिहासिक लिखाणाबद्दल त्यांना एकाही विद्यापीठाने डॉक्टरेट का नाही दिली?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तरुणांमध्ये चुकीचा इतिहास जात आहे. इतिहासावर मी कुणाशीही चर्चा करण्यासाठी तयार आहे", असा आरोपही त्यांनी केला.