Jitendra Awhad vs Devendra Fadnavis: "हनुमान चालिसा सोडून पेट्रोल-डिझेलबद्दल बोलणं हेही नसे थोडके; जितेंद्र आव्हाडांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 05:56 PM2022-05-23T17:56:35+5:302022-05-23T18:04:00+5:30
राज ठाकरेंच्या वक्तव्याचाही घेतला समाचार
Jitendra Awhad vs Devendra Fadnavis: केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात मोठी कपात केली. पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आले. त्यामुळे यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९ रुपये ५० पैशाने तर डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी झाले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धीत करात छोट्या प्रमाणावर कपात केली. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. यास प्रत्युत्तर देताना राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवासांना टोला लगावला.
"देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. उशीरा का होईना पेट्रोल, डिझेल, गरीबांचे रोजगार याबद्दल त्यांना जाणीव होतेय. ३ मे रोजी महाराष्ट्रात काय तरी होईल अशी व्यवस्था करण्यात आली. मात्र राज्यातील जनतेचे, या मातीचं कौतुक आहे. इथे महाराष्ट्र धर्म पाळला गेला. महाराष्ट्राची जी खरी ओळख आहे ती शिवरायांनी करुन दिली आहे. ती शाहू-फुले-आंबेडकरांनी पुढे जपली. इथे धर्मांधतेला मान्यता मिळत नाही. जातीयवाद इथे जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे विरोधकांची जी इच्छा होती, जो प्लॅन होता तो महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांनी उधळून लावला. महाराष्ट्र धर्म पाळला गेला. आणि महत्त्वाचे म्हणजे आता हनुमान चालिसा सोडून हे लोक पेट्रोल-डिझेलवर बोलत आहेत, हे ही नसे थोडके", असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
राज ठाकरेंना आव्हाडांचा टोला...
यावेळी आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या विधानावरही भाष्य केले. राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत बोलताना, अयोध्या दौरा स्थगित करण्यामागचे कारण स्पष्ट केले. उत्तर भारतात मनसैनिकांना चिथवून त्यांना अडकवण्याचा सापळा रचण्यात आला होता आणि त्या सापळ्यात मनसेचे कार्यकर्ते अडकू द्यायचे नव्हते, असे राज ठाकरे म्हणाले. या मुद्द्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, "सापळा कुणी लावला? कुणासाठी लावला? यामध्ये आम्ही पडत नाही. सापळा लागला की नाही लागला तो त्यांनी बघावं. सापळा लावला होता की नाही हे त्यांनी बघावं. यांच्या आणि त्यांच्या नात्यातील तो सापळा होता."
"राजकारणात द्वेष असावा असं काही नसतं. हा परिपक्वतेचा भाग आहे. लोकांमधील विश्वासार्हता चहा आणि जेवणाने कमी होत नाही. ती विश्वासाने मिळालेली असते. ती सहजासहजी संपत नाही", असेही आव्हाड म्हणाले.
ओबीसी आरक्षणाबद्दल आव्हाड म्हणाले...
ओबीसी आरक्षण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हातात असते तर मी त्यांच्या शेजारी ठाण मांडून करुन घेतले असते. ओबीसी आरक्षण हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तत्वांवर आधारित आहे. सर्वोच्च न्यायालयात हा विषय आहे त्यावर राजकारण करणे ही आपली प्रगल्भता नाही हे दर्शवते. प्रगल्भता असेल तर तुम्हाला मान्य करावं लागेल की हे सर्व सर्वोच्च न्यायालयात पेंडीग आहे. ज्या पद्धतीने बांठिया आयोग काम करतोय डाटा गोळा करतोय त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शंभर टक्के महाराष्ट्राच्या बाजुने लागेल व ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल असा विश्वासही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.