'दीक्षित डाएट'पेक्षाही भारी फंडा, वजन घटवण्याचा 'शरद पवार फॉर्म्युला'
By राजा माने | Published: January 24, 2019 04:21 PM2019-01-24T16:21:10+5:302019-01-24T16:24:35+5:30
परवा शरद पवार यांच्याशी गप्पा मारतानाही फिटनेस, डाएटचा विषय निघाला. तेव्हा, त्यांनी आपला डाएट प्लॅन सांगितला.
- राजा माने
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं देशाच्या राजकारणातील वजन वेगळं सांगायची गरज नाही. लोकसभा निवडणुकीचे नगारे निनादू लागले असताना आणि केंद्रातील मोदी सरकारविरोधात महाआघाडीची मोट बांधली जात असताना शरद पवारांवर मोठीच जबाबदारी आहे. देशातील २० हून अधिक पक्षाच्या नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. स्वाभाविकच, त्यांचं राजकीय वजन अधिक वाढलंय. परंतु, शारीरिकदृष्ट्या 'फिट' राहण्यासाठी शरद पवारांनी आपलं वजन दोन-चार नव्हे, तर तब्बल १४ किलोंनी कमी केलंय. जगन्नाथ दीक्षित किंवा अन्य कुणा डॉक्टरच्या डाएटनं वगैरे नाही, तर स्वतःचाच फॉर्म्युला वापरून ते सहा महिन्यात चांगलेच बारीक झालेत.
सध्या आपल्या कानावर डाएटिंग, वेट लॉस असे शब्द सतत पडत असतात. दोन वेळा खा, कितीही खा, हा डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा 'डाएट प्लॅन' तर भलताच हिट झालाय. परवा शरद पवार यांच्याशी गप्पा मारतानाही फिटनेस, डाएटचा विषय निघाला. तेव्हा, त्यांनी आपला डाएट प्लॅन सांगितला.
कॅन्सरसारख्या राक्षसाला आपल्यापुढे गुडघे टेकायला लावणारे पवार तसे 'हाडाचे खवय्ये'! त्यात नॉन व्हेज हा तर त्यांच्या आवडीचा विषय. पण सहा महिन्यांपूर्वी त्यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. मनाचा ठाम निग्रह हे तर त्यांचे बलस्थानच! मग काय, त्यांनी आपला आवडीचा आणि जिव्हाळ्याचा नॉन व्हेज खाण्याचा विषय चुटकीसरशी बासनात गुंडाळला अन् चक्क नॉन व्हेज सोडले. अर्थात वैद्यकीय कारणास्तव त्यांना मासे खावे लागतात. पण, जेवणात केवळ एकच पोळी खाण्याचा नियमही त्यांनी केला. या आहाराला त्यांनी संधी मिळेल तेव्हा चालण्याची जोडही दिली. परिणामी, अवघ्या सहा महिन्यात त्यांचे वजन १४ किलोने घटले. त्यामुळे आता त्यांना अधिकच अॅक्टिव्ह, फ्रेश वाटू लागलंय.
देशाच्या आणि महाराष्ट्राचं राजकारण येत्या काळात कुठल्या दिशेनं जाईल, याबद्दलही शरद पवारांनी काही मतं, काही आडाखे 'लोकमत'शी बोलताना मांडले. त्यातील काही ठळक नोंदी खालीलप्रमाणे...
जो राज्यात मोठा,त्याच्याकडे त्या राज्याचे नेतृत्व... महाआघाडीचे सूत्रं!
भाजपविरोधी महाआघाडी राष्ट्रीय नसेल तर ती राज्या-राज्यातील पक्षांच्या प्रभावावर त्या राज्यातील पक्षाचे नेतृत्व व त्या राज्यातील महाआघाडी ठरेल.प.बंगालमध्ये ममता बॅनर्जी, केरळमध्ये डीएमके,आंध्रप्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू,महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी आणि त्याच पद्धतीने हरियाणा,पंजाबमध्ये काँग्रेस याच सूत्राने देशातील सर्वच राज्यात बांधली जात असल्याचे पवारांनी सांगितले.
२०१४ चे राहुल गांधी आता राहिले नाहीत..
२०१४ साली नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला स्वप्न दाखविली होती.जनतेचा स्वप्नभंग झाला. त्यावेळचे राहुल गांधी आणि त्यांची प्रतिमा ती राहिलेली नाही.ते अधिक आक्रमक झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
सहा जागांचा पेच आठवड्यात सुटणार
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागा वाटप अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या औरंगाबाद, अहमदनगर, माढा, रावेर,उस्मानाबाद, जळगाव या लोकसभा मतदारसंघांसंदर्भातील निर्णय आठवड्यात होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.