Join us

“ज्यांना कुणाला पक्ष सोडून जायचे असेल, तर...”; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 7:09 PM

Sharad Pawar: शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

Sharad Pawar:राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार हेच कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. समितीने याबाबतचा ठराव एकमताने मंजूर केल्यानंतर शरद पवार यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने, मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, असे शरद पवार यांनी जाहीर केले. 

पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याबाबत केला जात असलेल्या दाव्यासंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, कुणाला सोडून जायचे असेल, तर मग कोणत्याही पक्षाचा असो कोणी थांबवू शकत नाही. अशी परिस्थिती असेल तर पुढाकार घेत, यात बदल कसे घडवू शकतो, याकडे लक्ष दिले पाहिजे. हे मला समजते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

अजित पवार नाराज आहेत का? ते पत्रकार परिषदेत दिसत नाहीत

अजित पवार गैरहजर, नाराज आहेत का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, पत्रकार परिषदेला सर्वच नेते उपस्थित असतात का, ते नाहीत म्हणजे नाराज असे नाही. मी  माझ्या राजीनाम्याचा विचार अजित पवारांकडे व्यक्त केला‌ होता, इतरांना याबाबत कल्पना दिली नव्हती, असे शरद पवार यांनी सांगितले. 

दरम्यान, शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना आवाहन केले. आदरणीय शरद पवारसाहेब यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असून राज्यभरातील कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंद गावोगावी व प्रत्येक चौकाचौकात साखर वाटून साजरा करावा असे आवाहन मी करत आहे, असे ट्विट जयंत पाटील यांनी केले.

 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस