मुंबई - राज्यातील अनिश्चितचे राजकारण पाहता कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यातच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारमुंबईतील वर्षा या निवासस्थानी पोहोचले आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी नेमकं कोणत्या विषयावर चर्चा केली याची माहिती अद्याप नाही. मात्र, शरद पवार काही कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री शिंदेंना भेटल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आणि या आघाडीचे जनक म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. त्यामुळे, शरद पवारांची ही भेट कामानिमित्त असली तर याची राजकीय चर्चा राज्याच्या वर्तुळात होत आहे. या भेटीची अनेक पैलूंनी चर्चा केली जात आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विदेश दौऱ्यावर असताना ही भेट होत असल्यानेही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, ही सदिच्छा भेट होती, मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर आले होते, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच, ही राजकीय भेट नव्हती, सदिच्छा भेट होती, असे त्यांनी स्पष्ट केले.