मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी झाला असून विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप उमेदवाराला बहुमत मिळाल्याने विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची वर्णी लागली. नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आज सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. तर, सत्ताधाऱ्यांनीही पलटवार केला. आता, सोमवारी एकनाथ शिंदे यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. तत्पूर्वीच मोठी बातमी समोर आली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shrad Pawar) यांनी आज मुंबईत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचची महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत शरद पवारांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत (Mid Term Elections) दिले असून नेत्यांनी तयार राहवे, अशा सूचनाही दिल्याचे समजते. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीसंदर्भात ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावरही, चर्चा झाली आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होण्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होणार होतील, असं भाकीत त्यांनी वर्तवल्याची माहिती आहे.
शरद पवारांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणाता आता पुन्हा भूकंप होतो की काय, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, शिवसेनेतील शिंदे गटाने मोठा बंडाचा पवित्रा घेत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. विशेष म्हणजे सोमवारी या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. मात्र, तत्पूर्वीच शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याच्याशीच मिळते-जुळते विधान ट्विटरवरुन केले होते.