Join us

'राज ठाकरे अन् एकनाथ शिंदे ५० वेळा एकमेकांकडे चहा प्यायले, त्यामुळे...'; आव्हाडांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 5:37 PM

दुसऱ्याच्या पक्षात काय सुरु आहे, कशाला बघताय?, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. 

सध्याचे राजकारण म्हणजे आळवावरचं पाणी झालं आहे. कोण कोणत्या पक्षात अन कोण कोणाबरोबर हेच समजत नाही. वरून दाखवायला वेगळे व आतून सर्व जण एकच असल्याचा टोला लगावत माझ्या हातात सत्ता द्या, मी भोंगे बंद करून दाखवतो असं म्हणत मनसेप्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. 

जनसंघ म्हणजे आताचा भाजपा, शिवसेना व मनसे हेच खरे तीन पक्ष आहेत. राष्ट्रवादीला पक्ष म्हणणार नाही. कारण राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी आहे. शरद पवार हेच करत आले. त्यांना सोबत घेतात. दुसरीकडे गेले तरी ते निवडून येणारच, असं राज ठाकरेंनी सांगितले. राज ठाकरेंच्या या टीकेवर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. 

वर्षभरात ५० वेळा राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे चहा प्यायले आहेत. त्यामुळे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. स्वत:च नाटक कंपनी अन् मिमिक्री आर्टिस्ट आहेत, त्यामुळे ते कोणाचीही नक्कल करु शकतात. दुसऱ्याच्या पक्षात काय सुरु आहे, कशाला बघताय?, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. 

माझ्या कडेवरती माझीच पोरं खेळवायची आहेत- राज ठाकरे

सध्याच्या राजकारणावर राज ठाकरे यांनी चांगलीच तोफ डागली. कोण कोणत्या पक्षात अन कोण कोणाबरोबर हेच समजत नाही. त्यामुळे माझ्या कडेवरती माझीच पोरं खेळवायची आहेत, इतरांची नाही. दुसऱ्याची पोरं आपल्या कड्यावर घेऊन खेळवायची मला हौस नाही असा टोला त्यांनी सध्या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर लगावला. 

महाराष्ट्र घडवायचाय...

आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. जे जे काही शक्य असेल ते या महाराष्ट्रासाठी करूया. जातीपातीचं राजकारण करायचे नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातीच्या लोकांना एकत्र आणले होते. त्यांचा आदर्श आजच्या राजकारण्यांनी घेण्याची गरज असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :राज ठाकरेजितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेसमनसे