मुंबई – गेल्या अनेक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंब ठिय्या मांडून आहे. मात्र आज संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी चप्पला फेकल्या. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.
सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सिल्व्हर ओकला दाखल झाले. संतप्त एसटी कर्मचारी शरद पवारांच्या निवासस्थानी सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. शरद पवार, अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. एसटी विलिनीकरणासाठी ११७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मात्र सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शरद पवारांच्या घरावर आंदोलन होत असल्याचं समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचेही कार्यकर्ते पवारांच्या घराबाहेर जमले.
यावेळी राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनीच कर्मचाऱ्यांनाच भडकावून शरद पवारांच्या घरी हल्ला करण्यास सांगितले. अनेक कर्मचारी दारू पिऊन याठिकाणी आले होते. सदावर्तेंना आम्ही सोडणार नाही. हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं असं आव्हान त्यांनी केले. आझाद मैदानावर संप चालू होता. सरकारशी बोलणी सुरू होती. कोर्टात प्रकरण आहे. कर्मचाऱ्यांना बोलण्याची संधी दिली होती. मात्र याप्रकारचा हल्ला खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
आतापर्यंतच्या इतिहासात असं कधी घडलं नाही
गेली अनेक दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. सरकारला हा विषय नीट हाताळता आला नाही. आतापर्यंतच्या इतिहासात ज्येष्ठ नेत्याच्या घरी हल्ला झाला नव्हता. सरकारने संबंधित मंत्र्यांनी हा विषय हाताळायला हवा होता. मात्र तसे झाले नाही असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय घडलं?
अनेक संपकरी ST कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराकडे चप्पलफेक आणि दगडफेक केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही. यानंतर आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्व्हर ओकमध्ये दाखल झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.