दिल्लीत जे घडलं ते रोज टीव्हीवर दाखवण्याची गरज आहे का?; 'मरकज'वर शरद पवारांनी मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 01:01 PM2020-04-06T13:01:51+5:302020-04-06T13:04:29+5:30
आपण कोरोनाबाबत काळजी घेतली तर निश्चित आपल्याला यश मिळेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
मुंबई: दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी द्यायला नको होती. महाराष्ट्र सरकारने जशी तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, तशीच दिल्लीतही परवानगी नाकारायला हवी होती. दिल्लीत थोडी खबरदारी घेतली असती तर आज देशभरात वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे लोकांशी संवाद साधत विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार म्हणाले की, दिल्लीत खबरदारी घेतली असती तर वृत्तवाहिन्यांवरून एखाद्या वर्गाचं वारंवारं वेगळ चित्रं निर्माण केलं गेलं नसतं. तसेच एखाद्या वर्गाचं असं चित्रं निर्माण करून त्यात सांप्रदायिक भर घालण्याची संधी वृत्तवाहिन्यांना मिळाली नसती असं शरद पवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे दिल्लीमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाबाबतच्या बातम्या वारंवार टिव्हीवर दाखवण्याची काय गरज आहे असा सवाल देखील शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
समाजाताली सर्व घटकांनी एकत्र राहण्याची गरज आहे. सोशल मीडियावरील मेसेज काळजी करण्यासारखे आहे. कारण पाचपैकी चार मेसेज खोटे असतात. पुन्हा पुन्हा हे मेसेज व्हायरल करून खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच यामागे कुणाचे षडयंत्र आहे का? याची शंका येते, असं देखील शरद पवरांनी यावेळी सांगितले.
देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आज १३ वा दिवस आहे. आपण कोरोनाबाबत काळजी घेतली तर निश्चित आपल्याला यश मिळेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच आर्थिक संकटांशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आर्थिक पॅकेज देण्याची मागणी देखील शरद पवार यांनी केली आहे.