Join us

अजित पवारांमुळे भाजपची किंमत कमी झाली? शरद पवार म्हणाले, "त्यांचा अनुभव..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 3:49 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

Sharad Pawar on Organizer Article : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असणाऱ्या ऑर्गनायझर मासिकात छापून आलेल्या एका लेखातून महाराष्ट्रातील अनावश्यक राजकारणाबाबत भाष्य करण्यात आलं होतं. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे खापर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फोडण्यात आलं होतं. भाजपला लोकसभा निवडणुकीत अजित पवारांमुळे नुकसान झाल्याचे आरएसएसचे आजीवन सदस्य रतन शारदा यांनी म्हटलं होतं. या सगळ्यावर आता राष्ट्रावादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेते शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी ऑर्गनायझरमधून अजित पवारांवर केलेल्या टीकेवर भाष्य केलं. "महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली," असे ऑर्गनायझरमध्ये म्हटलं होतं.

अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने आपली किंमत कमी करुन घेतली या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "त्यांना नेमकं एवढंच सांगायचे आहे की, महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला. त्या सर्वांची कारणे अनेक आहेत. पण ते अजूनही बोलू इच्छित नाहीत. त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. आम्ही कशाला काय सांगू," अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.  

अजित पवारांचे स्पष्टीकरण

ऑर्गनायझरमधील लेखावरुन अजित पवार यांनी देखील भाष्य केलं. "फक्त विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष द्यायचे आहे. महत्त्वाची कामे कशी मार्गी लागतील, याचा विचार करतो आहे. यासंदर्भात काहीही बोलायचे नाही. निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक जण आपले मत मांडत असतो. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडायचा किंवा भूमिका स्पष्ट करायचा पूर्ण अधिकार आहे. येणाऱ्या विधानसभेत नव्या उमेदीने पुढे जाण्याचा माझा प्रयत्न आहे," असे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्रशरद पवारअजित पवारभाजपादेवेंद्र फडणवीस