Join us

शरद पवारांची माढ्यातून माघार, तरुणाईला संधी देण्यासाठी निवडणूक लढविण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 3:12 PM

शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशा बातम्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

मुंबई - लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली. तसेच, उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्याबाबतही मत स्पष्ट केले. तसेच, माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार नसल्याचे एकप्रकारे मान्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची अन् कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली नाही. तसेच नव्या पिढीला संधी देण्यासाठी मी निवडणूक न लढण्याचा विचार आमच्या कुटिंबीयात झाल्याचे पवार यांनी म्हटले आहे. 

शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशा बातम्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. विशेष म्हणजे खुद्द शरद पवार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र, निवडणुकांची घोषणा होताच पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली उमेदवारी अद्याप निश्चित नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, आम्हा कुटुंबीयांचेही निवडणूक लढविण्याबाबत काही निर्णय झाले आहेत. त्यानुसार, मी निवडणूक लढविण्याऐवजी नव्या पिढीला संधी द्यावी, अशी भूमिका माझ्या कुटुंबीयांची आहे. त्यामुळे, पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी नेते आग्रही आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन मी निवडणूक न लढवण्याचा विचार करत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, पवार कुटुंबीयांतून सुप्रिया आणि मी दोघेच लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात होतो. पण, यापुढे सुप्रिया आणि पार्थ हे लोकसभेच्या रिंगणात असतील, असेही पवार यांनी सांगितले. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पवार हे देशाचे नेते असून देशभर प्रचाराची जबाबदारी लक्षात घेता, निवडणूक न लढवण्याचा आग्रह पवारांना केंद्रीय पातळीवरुन करण्यात आल्याची माहिती आहे.  माढा लोकसभा मतदारसंघातील तालुके

करमाळा, माढा, सांगोले, माळशिरस, फलटण,  माण 

माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदासंघांपैकी 3 राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेकडे प्रत्येक 1 मतदारसंघ आहे. त्यामुळे माढ्याची ही जागा पवारांसाठी तुलनेनं सोपी मानली जाते. 2009 सालीही पवारांनी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूक २०१९सोलापूर