Sharad Pawar: 'CMच्या खुर्चीवर बसून तुम्ही काम करताय', शरद पवार हसले आणि म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 05:04 PM2022-01-11T17:04:35+5:302022-01-11T17:13:33+5:30
Sharad Pawar On CM Uddhav Thackeray: देशात सध्या पाच राज्यांच्या विधआनसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि सर्व पक्षांनी कंबर कसली आहे.
Sharad Pawar On CM Uddhav Thackeray: देशात सध्या पाच राज्यांच्या विधआनसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही आता पाच पैकी तीन राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा करत रणशिंग फुंकलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजवादी आणि इतर छोट्या पक्षांसोबर आघाडी करून निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच लवकरच उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार असल्याचंही पवार यांनी जाहीर केलं.
विधानसभा निवडणुकीसाठीचा राष्ट्रवादीचा प्लान स्पष्ट करुन झाल्यानंतर पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली. राज्यात सध्या मुख्यमंत्र्यांच्या जागी तुम्हीच खुर्चीवर बसून सरकार चालवत आहात अशी टिका केली जात आहे, असं पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी मिश्किल हास्य करत विरोधकांकडून केली जाणाऱ्या अशा विधानांना फारसं महत्त्वं देण्याची गरज नसल्याचं म्हटलं.
"तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत म्हणत असाल तर परिवहन कामगारांची मोठा संघटना आहे. त्यांना मी या प्रश्नात लक्षं घालावं असी मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे कामगारांच्या पोटाचा प्रश्न असल्यानं मी त्यात लक्ष घातलं आणि चर्चेत सामील होणं म्हणजे सरकार चालवणं नव्हे", असं शरद पवार म्हणाले.
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीवरही केलं भाष्य
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीबाबत विचारल असला शरद पवार यांनी घडलेली घटनेचं समर्थन करताच येणार नाही असं म्हटलं. "पंतप्रधानांची सुरक्षा ही राज्य आणि केंद्र या दोघांचीही जबाबदारी आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घ्यायलाच हवी. घडलेल्या घटनेबाबत आता सुप्रीम कोर्टानं लक्षं घालून समितीची नेमणूक करुन चौकशीचे आदेश दिले आहे अशावेळी या प्रकरणात अधिक काही वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही. सुप्रीम कोर्टानं यात लक्षं घातलेलं असताना या मुद्द्याला निवडणुकीच्या तोंडावर केंद्रस्थान बनवणं अयोग्य आहे", असं शरद पवार म्हणाले.