मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना ८१ व्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नेहरु सेंटर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. या सोहळ्यात शरद पवार यांनीही अनेक जुन्या गोष्टी, आठवणींना उजाळा दिला. तसेच देश व सामान्य लोकांसमोर असंख्य प्रश्न, यावर आपल्यालाच उपाय शोधायचा आहे, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
१२ डिसेंबर माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी माझा वाढदिवस असतो, म्हणून नाही, तर माझ्या आईचा वाढदिवस असतो, म्हणून हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. यावर्षीचा वाढदिवस साजरा करण्याचे औचित्य नाही. मात्र, या कार्यक्रमातून पुढील कामासाठी ऊर्जा मिळाली, या शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय असेल अशी बांधणी करायची आहे
राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय असेल अशी बांधणी करायची आहे. समाजावर जे अन्याय अत्याचार झाले त्याची जाणीव राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हवी. अस्वस्थ माणसांशी समरस होणार कार्यकर्ता व्हायला हवा. देशासमोर आणि सामान्य माणसासमोर असंख्य प्रश्न, समस्या आहेत आणि आपल्यालाच त्याचा उपाय शोधायचा आहे. आपल्यालाच प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केली. तसेच समाजातील उपेक्षित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. तो अधिकार त्यांना मिळायला हवा. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवा, अशी आशा शरद पवार यांनी व्यक्त केली.
दरम्यान, समाजातील उपेक्षित वर्गावर जे अत्याचार अन्याय केले. त्याची अस्वस्थता त्यांच्या मनात आहे. ती दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची परिकाष्टा करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हे सर्व ऐकल्यावर अस्वस्थ झाला तर तो खरा कार्यकर्ता आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.