Sharad Pawar News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे. मुंबईत महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंपासून ते जयंत पाटील यांच्यापर्यंत अनेकांनी मार्गदर्शन केले. यावेळी शरद पवार यांनीही संबोधित केले. देशाच्या संसदेत आम्ही पाहतो की, देशाचे पंतप्रधान या संसदेची प्रतिष्ठा किती ठेवतात. लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनात पंतप्रधान एकदाही सभेत आले नाही. त्या सदनाची किंमत प्रतिष्ठा आणि महत्त्व याकडे ढुंकून पाहत नाही. त्याची प्रचिती आम्हाला वारंवार येत आहे, असे सांगत शरद पवार यांनी निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले की, आजही काही संस्था आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष. पंतप्रधान हे संस्था आहेत. विरोधी पक्षनेते हे संस्था आहेत. पंतप्रधानांची प्रतिष्ठा देशाने ठेवली पाहिजे. विरोधी पक्षाची प्रतिष्ठाही ठेवली पाहिजे. १५ ऑगस्टला विरोधी पक्षनेते पाचव्या ओळीत बसले होते. मी विरोधी पक्षनेता होतो. वाजपेयी पंतप्रधान होते. माझी बसण्याची सोय कॅबिनेट मंत्र्यांसोबत होती. मनमोहन सिंग पंतप्रधान होते. तेव्हा दिवंगत सुषमा स्वराज या विरोधी पक्षनेत्या म्हणून कॅबिनेट मंत्र्यांसोबत बसल्या होत्या. याचा अर्थ व्यक्ती महत्त्वाचे नाहीत. त्या संस्था महत्त्वाच्या आहेत. त्यांची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. या संस्था आहेत. लोकशाहीच्या संस्था आहेत. त्याचा सन्मान केला पाहिजे, या शब्दांत शरद पवार यांनी राहुल गांधी यांना दिलेल्या जागेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
संविधानावरचे संकट टळलेले नाही
महाराष्ट्राची संकटातून कशी सुटका करता येईल यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिन झाला आहे. त्यानंतर आपला मेळावा होत आहे. अनेकांची भाषणे झाली. प्रत्येकाने राज्यात जे परिवर्तन करायचं आहे, त्यासाठी काय करायचे याचे मार्गदर्शन केले. महाराष्ट्रापुरता विचार करण्याचे दिवस आहेत असे वाटत नाही. राज्याचा विचार करावाच लागेल. पण देशावरचे संकट पूर्णपणे गेले असा निष्कर्ष काढता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत आपण संविधानाची भूमिका मांडली होती. जबाबदारीने सांगतो की, त्या निवडणुकीत काही प्रमाणात यश आले आहे. पण संविधानावरचे संकट टळले असा निष्कर्ष काढता येत नाही. ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत, त्यांचा संवैधानिक संस्था आणि विचारधारा, तरतूदी यांच्याबाबत आस्था नाही, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, लोकशाहीच्या संस्था आहेत. त्याचा सन्मान केला पाहिजे. ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यांच्याकडून मल्लिकार्जुन खरगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल, अशी अपेक्षा ठेवली तर ती केली गेली नाही. लोकशाहीच्या संस्थात्मक यंत्रणावर विश्वास नसलेलेल राज्यकर्ते देशाच्या सरकारमध्ये आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.