Join us

Sharad Pawar Birthday: “‘ती’ कविता ऐकली की रात्री झोप येत नाही, आपण स्वत: गुन्हेगार आहोत असं वाटतं”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 6:08 PM

तो तरुण म्हणाला की, तुमच्या सर्वांविरुद्ध विचार करतोय; वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी सांगितली विशेष आठवण.

मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना ८१ व्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नेहरु सेंटर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. या सोहळ्यात शरद पवार यांनीही अनेक जुन्या गोष्टी, आठवणींना उजाळा दिला. मी एक कविता ऐकली होती. मला पूर्णपणे ती आठवत नाही. परंतु, अशी एखादी कविता ऐकली की रात्री झोप येत नाही. आपण स्वतः गुन्हेगार आहोत असे वाटते, असे शरद पवार यांनी सांगितले. 

एक कविता ऐकली होती. मला पूर्ण आठवत नाही. त्या कवीचे नाव मोतीलाल राठोड असावे. तो कवी बंजारा समाजाचा कार्यकर्ता आहे. ते पालं म्हणजे झोपड्यांमध्ये राहतात. मी त्याला सहज विचारले हल्ली तू काय विचार करतोय? तो म्हटला मी तुमच्या सर्वांच्या विरुद्ध विचार करतोय. त्याने त्याची लहानशी कविता सांगितली. त्या कवितेचे नाव पाथरवट. पाथरवट म्हणजे छन्नी हातात घेऊन हातोड्याने मूर्तीचे दगड फोडणारे पाथरवट, अशी एक आठवण शरद पवार यांनी सांगितली. 

ही तुमची समाज व्यवस्था आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे

त्या कवितेत त्याने सांगितले, हा मोठा दगड आम्ही घेतला, आमच्या घामाने, कष्टाने, हातातील छन्नीने आणि हातोड्याने त्या दगडाचे मूर्तीत रुपांतर करतो. यानंतर सगळे गाव आले आणि वाजत गाजत ती मूर्ती मंदिरात प्रतिष्ठापित केली. त्यापूर्वी माझ्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नव्हते. माझ्या घामाने मूर्ती तयार झाल्यानंतर मी दलित आहे म्हणून मला मंदिरात प्रवेश नाही. ही मूर्ती तुमच्या बापजाद्यांचे प्रतिक आहे, पण तिचा बापजादा मी आहे. असे असताना त्या मंदिरात तुम्ही मला येऊ देखील देत नाहीत. ही तुमची समाज व्यवस्था आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे. अशी एखादी कविता ऐकली की रात्री झोप येऊ शकत नाही. आपण स्वतः गुन्हेगार आहोत असे वाटते, असे शरद पवार यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 

तो खरा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता

आपण काही केले असो अथवा नसो, पण आपण त्या समाजाचे प्रतिनिधी आहोत. या समाजातील उपेक्षित वर्गावर जे अत्याचार अन्याय केले त्याची अस्वस्थता त्यांच्या मनात आहे. ती दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची परिकाष्टा करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हे सर्व ऐकल्यावर अस्वस्थ झाला तर तो खरा कार्यकर्ता आहे, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय असेल अशी बांधणी करायची आहे. समाजावर जे अन्याय अत्याचार झाले त्याची जाणीव राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हवी. अस्वस्थ माणसांशी समरस होणार कार्यकर्ता व्हायला हवा. देशासमोर आणि सामान्य माणसासमोर असंख्य प्रश्न, समस्या आहेत आणि आपल्यालाच त्याचा उपाय शोधायचा आहे. आपल्यालाच प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केली.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबई