मुंबई: आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत ज्याचा उल्लेख आता केला आणि ज्या कामासाठी पक्षाचे अध्यक्ष आता गव्हर्नरांकडे गेले तो एक आरक्षणाचा प्रश्न. यापूर्वी चर्चा झाली होती व निर्णय सुद्धा घेतला होता. दुर्दैवाने कोर्टामध्ये वेगळी भूमिका ही घेतली गेली आणि त्यातून काहीतरी मार्ग काढण्याची इच्छा होती. आज त्या संबंधी उपोषण जालना जिल्ह्यामध्ये जरांगे पाटलांनी केलं. मी स्वतः पहिल्यांदा त्यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो, त्यांच्या मागण्या काय ते समजून घेतलं. त्यातून मार्ग कसा काढता येईल? त्या संबंधी विचारविनिमय केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले. मुंबईतील पक्षाच्या एका आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने काही निकाल घ्यायची आवश्यकता होती ती लांबवली. त्याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा वणवा पेटेल की काय या प्रकारची एक स्थिती निर्माण झाली, अशी भीती शरद पवारांनी व्यक्त केली. जरांगे पाटलांची जी काही त्यांची मागणी असेल त्या मागणीची पूर्तता केली पाहिजे. ती करत असताना दुसऱ्याच्या कोणाच्या ताटातून काही आपल्याला काढून घ्यायचं नाही. त्यांच्या ताटातलं आहे ते तिथेच राहिलं पाहिजे. आज जी काही मागणी या मराठा समाजाने केलेली आहे, त्याची पूर्तता ही योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकता असल्याचं शरद पवार म्हणाले.
१९८० साली निवडणुका झाल्या आणि माझ्याबरोबर ५९ आमदार निवडून आले. त्यानंतर काही कामासाठी मी परदेशात गेलो. तिथून परत आलो तर त्या ५९ मधले ०५ सोडून सगळे गेले. मोठे मोठे लोक होते सगळे गेले. मी सभागृहात ५९ चा पुढारी होतो तो मी ०५ चा पुढारी राहिलो. पुन्हा निवडणूक ज्या वेळेला आली त्या वेळेला जे गेले त्यातले ०२ सोडले तर बाकी सगळे पडले. लोकांनी सगळ्यांना धडा शिकवला, लोकांना हे आवडत नसतं, असं शरद पवारांनी यावेळी सांगितले.
दिलेले शब्द न पाळणे ही भूमिका लोक त्यावेळेस गप्प बसतात पण लोकशाहीमध्ये ज्या वेळेला त्यांना तिथे जाऊन मत टाकायचं असतं किंवा बटण दाबायचं असतं त्यावेळेला कुणाला दाबायचं, कोणी काय केलं या सर्व गोष्टींची आठवण त्या मतदाराला होत असते आणि योग्य पद्धतीने निकाल तो त्या ठिकाणी घेत असतो. त्याची पुनरावृत्ती आम्हाला पुन्हा दिसेल याबद्दल माझ्या मनात कुठल्याच पद्धतीची शंका नाही. मग ते अहमदपूर असेल नाहीतर उदगीर असेल नाहीतर आणखी काही असेल, असं शरद पवारांनी सांगितले.