१२५ तासांचं रेकॉर्डिंग होतं हे कौतुकास्पद, केंद्रीय पाठबळाशिवाय शक्य नाही; शरद पवारांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 11:34 AM2022-03-09T11:34:36+5:302022-03-09T11:35:12+5:30
एखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन १२५ तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
मुंबई-
एखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन १२५ तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडीतर्फे भाजप नेत्यांविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप काल केला. यासाठी त्यांनी तब्बल १२५ तासांचं व्हिडिओ फुटेजदेखील सादर केलं. या व्हिडिओतील काही धक्कादायक संवाद त्यांनी विधानसभेत सादर केले. या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. या व्हिडिओत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचंही नाव आहे. याचं प्रकरणावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.
"फडणवीसांनी ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. पण मला कौतुक वाटलं एका शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्याच्या संबंधीत १२५ तासांची रेकॉर्डिंग हे करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले. ही कौतुकास्पद बाब आहे. १२५ तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल याचा हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब आहे. १२५ तास रेकॉर्डिंग करण्याचं काम खरंच असेल तर शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा एजन्सी या फक्त भारत सरकारकडे आहेत. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही", असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
माझा याप्रकरणाशी काहीही संबंध नाही- पवार
फडणवीसांनी सादर केलेल्या व्हिडिओ शरद पवार यांचंही नाव समोर आलं आहे. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं. "एका व्हिडिओ माझंही अप्रत्यक्षपणे नाव घेण्यात आलं आहे. पण माझं कधी या संबंधात कुणाशी बोलणं व्हायचं कारण नाही. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यामुळ राज्य सरकारनं या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी आणि यामागची सत्यता तपासावी", असं शरद पवार म्हणाले.