"एकाची हत्या झाली अन् आता दुसरा प्रयत्न..."; सैफवरील हल्ल्यावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:44 IST2025-01-16T11:36:58+5:302025-01-16T11:44:44+5:30

सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष देण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar says CM Devendra Fadnavis need to pay attention to this after the attack on Saif Ali Khan | "एकाची हत्या झाली अन् आता दुसरा प्रयत्न..."; सैफवरील हल्ल्यावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

"एकाची हत्या झाली अन् आता दुसरा प्रयत्न..."; सैफवरील हल्ल्यावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Sharad Pawar on Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर बॉलिवुडमध्ये खळबळ उडाली आहे. रात्री २ वाजण्याच्या सुमारास सैफच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसली होती. मोलकरणीसोबत झालेल्या वादावादीनंतर सैफ तिथे पोहोचला आणि त्याने अज्ञात व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी धारदार शस्त्राने अज्ञाताने सैफवर सहा वार केले. या हल्ल्यात सैफ झाला असून त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जनता आता त्यांच्या पाठीशी असल्याने मुख्यमंत्र्‍यांनी यामध्ये लक्ष देण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले.
 
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर हायप्रोफाईल अशा वांद्रे परिसरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी जीवघेणा हल्ला झाला. सैफवरील हल्ल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शरद पवार यांनीही या हल्ल्यावरुन प्रतिक्रिया देताना चिंता व्यक्त केली आहे.

"मुंबईतील कायदा सुव्यस्था किती ढासळत आहे याचे हे लक्षण आहे. मध्यतरी त्याच भागात एकाची हत्या झाली आणि हा आता दुसरा प्रयत्न. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी गृहखाते त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं," असं शरद पवार यांनी म्हटलं.

९० टक्के पोलिस दल आता राजकारण्यांकडे - संजय राऊत

"राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. सैफ हा एक मोठा अभिनेता आहे ज्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. काल पंतप्रधान मोदी शहरात होते त्यामुळे सर्व सुरक्षा व्यवस्था तिथे होती. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पोलीस सहभागी असतील त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही. अलिकडेच सैफ अली खान आणि त्याचे कुटुंब पंतप्रधानांना भेटायला गेले होते आणि त्यांनी त्यांच्यासोबत एक तास घालवला. राज्यात कोणीही सुरक्षित नाही. सामान्य माणसासाठी सुरक्षा नाही. ९० टक्के पोलिस दल आता राजकारण्यांकडे आहे," अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात घुसला होता. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. घटनेच्या वेळी अभिनेत्याशिवाय कुटुंबातील काही सदस्यही घरात उपस्थित होते. सध्या मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Sharad Pawar says CM Devendra Fadnavis need to pay attention to this after the attack on Saif Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.