नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढा उभारण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र दुसरीकडे विरोधकांमधून पंतप्रधानपदासाठीचा उमेदवार म्हणून कोण समोर येणार, यावर पुरेपूर मौन बाळगण्यात येत आहे. या सर्व चर्चांदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक फॉर्म्युला देत या मुद्याला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
(दिल्ली शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारी राजधानी : शरद पवार)
पंतप्रधानपद उमेदवारीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये ज्या पार्टीचा सर्वाधिक जागांवर विजय होईल ती पार्टी पंतप्रधानपदासाठी दावा करू शकते. शरद पवार पुढे असंही म्हणाले की, आधी निवडणूक होऊ द्या आणि भाजपाला सत्तेबाहेर जाऊ द्या. त्यानंतर सर्वपक्षीय बैठक घेऊ आणि ज्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, त्या पक्षाला पंतप्रधानपदासाठी दावा करता येईल. ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार असतील त्याच पक्षाचा पंतप्रधान होईल.
दरम्यान, यापूर्वी राहुल गांधी यांनी काँग्रेसला जागा मिळाल्या तर मीच पंतप्रधान होणार असं वक्तव्य केलं होतं. परंतु राहुल गांधींनीच मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचंही स्पष्ट केले आहे. यावरही शरद पवार असं म्हणाले की, मी खूश आहे की, राहुल गांधी यांनीही पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केले. 'पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहत नाही', असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारतीय पत्रकारांसोबत संवाद साधताना सांगितले होते.