मुंबई - राज्यात गेल्या 13 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून भाजप नेत्यांनी आता सहभाग घेतला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. राज्यातील एसटी डेपोत कर्मचारी आंदोलन करत होते. मात्र, आता या कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच केली आहे. आझाद मैदानावर मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब जमले आहे. या आंदोलनात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत सक्रीयपणे उतरले आहेत. सदाभाऊ खोत यांनी आंदोलनावरुन शरद पवारांना प्रश्न विचारले आहेत.
पडळकर, सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी बुधवारी रात्रीचा मुक्काम आझाद मैदानातच केला. कर्मचाऱ्यांसोबत जेवण आणि त्यानंतर तिथेच दोन्ही नेते झोपले होते. या आंदोलनावरुन सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर घणाघात केला आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत
हे भारतीय जनता पक्षाला बळी पडू नका म्हणतात, दरवर्षीच्या अधिवेशनाला कोण येत होतं. अधिवेशनाला शरद पवार यायचे आणि म्हणायचे या एसटी कंडक्टरने माझा प्रचार केलाय, तिकीट फाडत फाडत मला मत द्या असं सागांयचे. मी लहानपणी एसटीनं जात होतो, असे पवार सांगायचे मग आता गप्प का? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. आत्ता अधिवेशन झालं, तेव्हाही शरद पवार म्हणाले, मी अजित पवारांना सांगतो, परब तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा आणि ह्यांचा एकदा निकालच लावून टाकुयात. पण, असा ह्यांचा निकाल लावला की 30 पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्या. या 7-8 दिवसांत ते भाजपचं ऐकू नका म्हणालयलेत, म्हणजे या 7-8 दिवसांतच ही लोकं आमच्या बाजुने आलेत का? असा प्रश्नही सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.
काय म्हणाले पडळकर
राज्यात ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीय. मराठीच्या नावावर मतांचा जोगवा मागणारी मंडळी त्यावर काही बोलायला तयार नाही. सरकारने मार्ग काढला नाही तर आंदोलन उग्र होईल. कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अश्रू पुसण्याऐवजी बडतर्फाची कारवाई करताय. माणूस आत्महत्या करतोय कारण त्याला पुढे काही दिसत नाही. आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत तुम्हाला काहीच वाटत नाही का? असा सवाल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(BJP Gopichand Padalkar) यांनी सरकारला केला आहे.