Join us

बारामतीचे पाणी रोखताच शरद पवार संतापले, जलसंपदामंत्र्यांचे कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 6:10 PM

जलसंपदा मंत्र्यांनी बारामतीचे पाणी रोखले, अशा बातम्या वर्तमानपत्रात झळकल्यानंतर दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच महाजन यांचे नाव न घेता कान टोचले.

मुंबई - नीरा-देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. याबाबतचा शासकीय अध्यादेश येत्या दोन दिवसांत काढला जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, महाजन यांच्या या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. राजकारण कुठ करावे याचं तारतम्य जपलं पाहिले, अशा शब्दात पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

जलसंपदा मंत्र्यांनी बारामतीचेपाणी रोखले, अशा बातम्या वर्तमानपत्रात झळकल्यानंतर दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच महाजन यांचे नाव न घेता कान टोचले. ''राजकारण कुठे करावे याचे तारतम्य जपले पाहिजे. भागा-भागात जिल्ह्या-जिल्ह्यात दुरावा निर्माण होता कामा नये, तशी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.'' असे म्हणत पवार यांनी पाणीप्रश्नावरुन संतप्त प्रतिक्रिया दिली. आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरुनही याबाबत माहिती देण्यात आली आहे. वीर-भाटघर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे 57 टक्के व डाव्या कालव्याद्वारे 43 टक्के पाणी वाटपाचे धोरण 1954 च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होते. डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होते.

4 एप्रिल 2007 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळात स्वत:ची राजकीय ताकद वापरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये नीरा देवधर धरणातून 60 टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्याला व 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतचा करण्यात आला होता. विधान परिषदेचे सभापतीपद मिळाल्याने आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या कराराला विरोध न करता संमती दिली होती. 3 एप्रिल 2017 रोजी करार संपल्यावरही बेकायदेशीरपणे हे पाणी बारामती तालुक्याला दिले जात होते. हे बेकायदा जाणारे पाणी बंद करून ते पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यास मिळावे, अशी मागणी खा. नाईक-निंबाळकर व माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांनी सोमवारी पुन्हा जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट घेतली. महाजन यांनी डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारे पाणी कायमचे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. याबाबत आदेश येत्या दोन दिवसांत काढावा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

फलटण, माळशिरस, पंढरपूरला फायदाहा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर या धरणातून बारामती व इंदापूर तालुक्याला जाणारे नियमबाह्य पाणी कायमस्वरूपी बंद होऊन फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना त्याचा 100 टक्के फायदा होणार आहे.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसगिरीश महाजनपाणीबारामती