Join us

12 आमदारांच्या नियुक्तीवरुन शरद पवारांचा राज्यपालांना खोचक टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 5:04 PM

राज्यपालांना 12 आमदारांच्या निुयक्तीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र गेलं होतं, कदाचित वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल, पण, पत्र गेलं होतं. अनेकदा गेलंय. मंत्री नवाब मलिक यांनीही एक पत्र दिलं आहे.

ठळक मुद्दे याबाबत आता आम्ही जास्त कमेंट करत नाही. कारण, आपल्याकडे एक म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा मार, पण शहाण्याला... असे म्हणत शरद पवार यांनी राज्यपालांना खोचक टोमणा मारला.

मुंबई - पुण्यातील ध्वजारोहन समारंभानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी, काँग्रेस नेते आमदार शरद रणपिसे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर राज्यपालांनी मिश्कील उत्तर दिले होते. त्यावरुन, आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपालांना खोचक टोमणा लगावला. 

शरद रणपिसे यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाहात राज्यपाल कोश्यारी यांनी मिश्कील उत्तर दिलं. अजित पवार सोबत आहेत, ते माझे मित्र आहेत. राज्य सरकार आग्रह धरत नाही तुम्ही का धरता? असे कोश्यारी यांनी म्हटलं होतं. कोश्यारी यांच्या या मिश्कीलतेवर शरद पवार यांनी गंभीरतेनं उत्तर दिलं आहे. शरद पवारांनी खोचक शब्दात राज्यपालांवर टीका केली. 

राज्यपालांना 12 आमदारांच्या निुयक्तीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र गेलं होतं, कदाचित वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल, पण, पत्र गेलं होतं. अनेकदा गेलंय. मंत्री नवाब मलिक यांनीही एक पत्र दिलं आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळही त्यांना भेटून आलं होतं. पण, याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. म्हणूनच याबाबत आता आम्ही जास्त कमेंट करत नाही. कारण, आपल्याकडे एक म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा मार, पण शहाण्याला... असे म्हणत शरद पवार यांनी राज्यपालांना खोचक टोमणा मारला. 

पुण्यातील कार्यक्रमात जुगलबंदी

ध्वजारोहन समारंभातील राज्यपाल कोश्यारी यांच्या उत्तरानंतर, आज स्वातंत्र्य दिन आहे या विषयावर नंतर बोलेन, असं अजित पवारांनी हसत हसत म्हटलं. त्यानंतर, याच मुद्द्यावर भाजपा नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपालच म्हणत आहेत सरकार आग्रह करत नाही. याचा अर्थ आघाडी सरकारच्या नेत्यांत समन्वय नाही. त्यामुळे तुम्ही काय ते समजून घ्यावं असं बापट यांनी म्हटलं.  

टॅग्स :शरद पवारभगत सिंह कोश्यारीराष्ट्रवादी काँग्रेसआमदारउद्धव ठाकरे