प्रविण मरगळे
मुंबई - राज्यात सत्तास्थापनेचा घोळ सुरु असताना महाराष्ट्रातील राजकारणाचं सत्ताकेंद्र म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं. निवडणुकीपूर्वी अनेक आमदारांनी पक्षाला रामराम केला, तरीही याची पर्वा न करता शरद पवारांनी जिद्दीने प्रचार सुरु केला. भर पावसात शरद पवारांनी केलेलं भाषण संपूर्ण राज्यभरात तुफान गाजलं. एखाद्या तरुणाला लाजवेल इतका उत्साह ८० वर्षाच्या शरद पवारांमध्ये आहे.
शरद पवारांच्या या झंझावती प्रचाराचा परिणाम म्हणून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ जागा निवडून आल्या. राज्यात सध्या सुरु असणाऱ्या घडामोडींमध्ये शरद पवार हे असं नेतृत्व ज्यांच्याभोवती राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. निवडणुकीपूर्वी शरद पवारांचा भर पावसात भिजत केलेल्या भाषणाचा फोटो जसा व्हायरल झाला तशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्याासाठी शरद पवार विधानभवनात गेले होते. त्यावेळी विधिमंडळाच्या पायरीवर शरद पवारांनी सहकाऱ्यांसोबत फोटो काढला. यावेळी हा फोटो काढताना शेजारी उभं असणाऱ्या सुरक्षारक्षकाला बोलवून घेत शरद पवारांनी फोटोत येण्याची विनंती केली. मान्यवर नेत्यासोबत उभं असणाऱ्या या सुरक्षारक्षकाचा फोटो पवारांच्या भावनिक कृतीमुळे व्हायरल होत आहे.
या फोटोबाबत आम्ही आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शरद पवारांच्या फोटोत असणाऱ्या सुरक्षा रक्षकाचं नावंही योगायोगानं शरद पवारच असल्याचं समजलं. विधान भवनातील सुरक्षा रक्षक हेदेखील बारामतीचेच. बारामती तालुक्यातील जोगवाडी त्यांच्या गावाचे नाव आहे. विधानभवनाच्या सुरक्षेसाठी गेली ३४ वर्ष शरद पवार अविरत सेवा देत आहे. शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळपासून सुरक्षारक्षक शरद पवारांनी त्यांना जवळून पाहिलं आहे. त्यांचा अनुभव बऱ्याचदा घेतला आहे.
इतक्या वर्षाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विधानभवनात दाखल झाले. त्यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या कार्यालयात जात असताना लिफ्टमध्ये सुरक्षा रक्षक शरद पवार हेदेखील उपस्थित होते. त्यावेळी सुरक्षारक्षक पवारांनी शरद पवारांना मीदेखील बारामतीचा असल्याचं सांगितले. तेव्हा आपुलकीने शरद पवारांनीही त्यांना गावाचं नावं विचारलं. बारामतीचे असल्याने आपुलकीच्या भावनेने शरद पवारांनी सुरक्षारक्षक पवारांची विचारपूस केली. या २ मिनिटांच्या लिफ्टमधील संवादात दोन्ही शरद पवारांमध्ये जिव्हाळा निर्माण झाला.
याबाबत बोलताना सुरक्षारक्षक शरद पवार म्हणाले की, विधानभवनाच्या लिफ्टमध्ये जाताना पवारसाहेबांशी बोलणं झालं. मीदेखील बारामती तालुक्यात जोगवडी गावचे रहिवाशी असल्याचं त्यांना सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून मी विधान भवनात काम करतो. मुख्यमंत्र्यापासून अनेक मंत्री सुरक्षा रक्षक पवारांना नावानिशी ओळखतात. अजित पवार आर्वजून कधीकधी उल्लेख करतात. हे आमच्या भागचे आहेत. अन् योगायोगाने यांचे नावही शरद पवार आहे. नावाची श्रीमंती लाभल्यामुळे नाव खराब होईल असं वागलो नाही असं ते अभिमानाने सांगतात.