मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर, राज्यासह देशाच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणल्यानंतर झालेल्या पवार-मोदी भेटीवरुन राष्ट्रवादीवर टिका होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत हे पवारांचेच असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं आहे. तर, आता भाजप नेते मोहित कंबोजनेही ट्विट करत राऊतांच्या पवार जवळीकीवर भाष्य केलंय.
मुंबईतील भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, त्यावेळी, गेल्या 20 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याबद्दल चर्चा केली नाही, जे सध्या तुरुंगात आहेत. मात्र, शिवसेनेच्या संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणल्याची चर्चा केली. म्हणजे, घर की मुर्गी दाल बराबर... असे कंबोज यांनी म्हटले. तसेच, गजब की राजनिती है भाई... असेही ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनीही केली टीका
आतापर्यंत महाविकास आघाडीच्या इतक्या नेत्यांवर कारवाई झाली. परंतू ज्येष्ठ नेते शरद पवार कोणालाही भेटायला गेले नाहीत. मात्र, संजय राऊत यांच्यावर कारवाई झाल्यावर मात्र त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवले. मी खूप आधीपासून सांगत होतो की संजय राऊत हे शिवसनेचे कमी आणि पवारांचे जास्त आहेत, यावर हे शिक्कामोर्तबच आहे असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. तसेच, शरद पवार हे फक्त चहा प्यायला नरेंद्र मोदींकडे जाणार नाहीत, एवढे मी खात्रीने सांगतो, असेही त्यांनी म्हटलं.
सोमय्यांची चूक असेल तर शासन होईल
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लोकवर्गणीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. यासंबंधी विचारले असता, किरीट सोमय्यांची चूक असेल तर शासन होईल असेही चंद्रकांत पाटली यांनी सांगितले.